येत्या २ नोव्हेंबरला द ग्रेट सुपरस्टार शाहरुख खान याचा ५७ वा वाढदिवस आहे. शाहरुखचे देशभरात तसेच जगभरात अनेक चाहते आहेत, शाहरुखने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ . २७ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही सगळ्यांच्या मनात घर करून आहे.
या चित्रपटामध्ये शाहरुखसह काजोलने मुख्य भूमिका साकारली होती, आजही ही जोडी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. येत्या बुधवारी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा पीव्हीआरच्या अनेक चित्रपटगृहांत पाहता येणार आहे. सध्या मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद, लखनऊ, पुणे आणि सुरतमध्ये या चित्रपटाचे बुकिंग सुरु झाले आहे.
View this post on Instagram
शाहरुखचा लवकरच ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याच्या वाढदिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. तब्बल ५ वर्षानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट हिंदी सह तामिळ आणि तेलुगु भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.