आत्तापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमे प्रेक्षकांना प्रेरणा देत आले आहेत. त्यात सध्याच्या घडीची प्रेरणादायी मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘अप्पी आमची कलेक्टर‘. एक अनोखा विषय श्वेता शिंदे यांच्या वज्र प्रोडक्शनने निर्मिती केली आहे.
यातील अप्पी ग्रामीण भागात राहणारी असून तिला शिक्षणाची प्रचंड आवड. परंतू तेथील अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, कोणाचे मार्गदर्शन नाही ना आर्थिकदृष्ट्या सक्षम. त्यामुळे तिच्या शिक्षणाच्या वाटेवर येणाऱ्या अडचणींना सामोरे जात ती तिच्या कलेक्टर बनण्याचे स्वप्न कसे पुर्ण करते हे दाखविले आहे.
या मालिकेने जवळपास आता २०० हून अधिक एपिसोडचा टप्पा पार केला असून अल्पावधीतच भरघोस लोकप्रियता मिळवली आहे. आता मालिकेत अप्पी देखील तिच्या स्वप्नपूर्तीपासून अगदी काहीच पाऊले दूर आहे. तर आता ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असून खूप महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे, तो म्हणजे मुलाखत.
नुकताच या मुलाखतीचा प्रोमो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे त्याचे कारण म्हणजे अप्पीला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर. अप्पीची मुलाखत घेण्यासाठी जेष्ठ वकील उज्जल निकम आणि आय.ए.एस. ऑफिसर विश्वास पाटील तिथे हजर असणार आहेत. मुलाखतीत अप्पीला विचारण्यात आले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?’ यावर उत्तर देताना अप्पी म्हणते की, “तसं तर अनेक इतिहासकारांनी प्रत्येक पुस्तकात वेगळी नोंद केली आहे. वेगवेगळे संदर्भ आहेत. त्यांची उंची अंदाजे पाच फूट पाच इंच ते पाच फूट आठ इंच एवढी असेल.” त्यावर मुलाखतकार म्हणतात की मला ठाम उत्तर हवे आहे.
त्यावर उत्तर देत आप्पी म्हणते, “मॅडम चार हजार सहाशे चार फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केलाय. साडेतीनशे वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी मोजायची, नाही का?” तिचे हे उत्तर ऐकून सोशल मीडियावर मालिकेची चांगलीच प्रशंसा होत आहे आणि या भूमिकेसाठी अप्पीचे देखील भरभरुन कौतुक होत आहे.