मराठमोळे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे आज निधन झाले. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या सिनेमामुळे ते सध्या प्रचंड चर्चेत आले होते. त्याचे कारणही खूपच खास होते. ते म्हणजे स्वतंत्र लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वप्नील यांचा हा पहिलाच सिनेमा.
मराठी पाऊल पडते पुढे हा सिनेमा ५ मे रोजी म्हणजेच उद्या प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वीच वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी स्वप्नील मयेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते परंतू १ मे पाहून तब्येत जरा खालावली म्हणून ते दवाखान्यात दाखल झाले होते. परंतू आज पहाटे चेंबूर घाटलागाव येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठी पाऊल पडते पुढे हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न. स्वप्नपूर्तीसाठी केवळ काही तासांचा कालावधी बाकी असताना दिग्दर्शकाच्या निधनाची मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे सध्या संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच या सिनेमात झळकणारे अभिनेता चिराग पाटील, अभिनेत्री सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्वप्निल मयेकर यांनी यापूर्वी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तर ‘हम है धर्मयोद्धा’ या भोजपुरी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून अनेक मराठी सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. परंतू उद्या प्रदर्शित होणाऱ्या मराठी पाऊल पडते पुढे या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतंत्रपणे केले आहे.
स्वप्नील मयेकर यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर त्यांना पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. स्वप्नील त्यांच्या या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक होते. त्यांनी सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे अनेक फोटोज् स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत.