२ ऑक्टोंबर रोजी काय झालं होतं हे तर सगळ्यांनाच माहित असेल. याच दिवशी विजय साळगावकर त्याच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन गोव्याला गेला होता सत्संगसाठी. दृश्यम या चित्रपटापासून २ ऑक्टोंबर ही तारीख सगळ्याच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांच्या ‘दृश्यम’ सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांनी देशभरात धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला आणि दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.
आता या सिनेमाचा कोरिअन भाषेत रिमेक होणार आहे. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’दरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अॅंथॉलॉजी स्टुडिओने ‘कान्स 2023’ चित्रपट महोत्सवादरम्यान भागीदारीची घोषणा केली. दरम्यान निर्माते कुमार मंगत पाठक आणि जय चोई उपस्थित होते. ‘दृश्यम’ या सिनेमाचा कोरिअन भाषेत होणारा रिमेक हा या भागीदारीचा सर्वात मोठा परिणाम आहे.
‘दृश्यम’ या चित्रपटाचा कोरिया रिमेक आणि अँथॉलॉजी स्टुडिओसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना कुमार मंगत म्हणाले, “दृश्यमचा रिमेक कोरियामध्ये बनत असल्यामुळे मी उत्साहित आहे. यामुळे भारताबाहेर त्याचा अवाका तर वाढेलच शिवाय हिंदी चित्रपटाची दखल जगभरात घेतली जाईल. इतकी वर्षे, आपण कोरियन चित्रपट पाहून प्रेरणा घेतली. आता त्यांना आपल्या चित्रपटांतून प्रेरणा मिळत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी यापेक्षा मोठी अभिमानास्पद बाब कोणती असू शकते.”
या चित्रपटाचा रिमेक एकूण चार भाषांमध्ये करण्यात आला आहे. सर्वात आधी २०१४ मध्ये कन्नडमध्ये हा चित्रपट करण्यात आला. त्यानंतर तेलुगुमध्ये दृश्यम (2014), तमिळमध्ये पापनासम (2015), आणि हिंदीमध्ये दृश्यम (2015). असे रिमेक करण्यात आले. आता कोरियन मध्ये देखील सिनेमा होणार आहे.