आपल्या अभिनयाने कायम प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे. करिअरच्या सुरुवातीलाच तिच्या उत्तम कामगिरीमुळे देशभरात तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अनेक मालिका आणि सिनेमांमधून प्रार्थनाने तिच्या अभिनयाची छाप रसिक प्रेक्षकांवर पाडली आहे. त्यामुळे तिला पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते कायम प्रचंड उत्सुक असतात. अनेक वर्षानंतर प्रार्थना नुकतीच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकली होती. अन् नेहमीप्रमाणे तिची ही मालिका चांगलीच गाजली. प्रार्थना सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते. त्यामुळे ती तिच्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजेच अलिबागमध्ये आलिशान घर घेतलं. तेव्हापासून प्रार्थनाने मुंबई सोडल्याची, तिच्या नव्या घराची बरीच चर्चा रंगली. त्यामुळे प्रार्थनाने तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच आता तिने यूट्यूब चॅनेलही नुकतेच सुरू केले. त्यातून तिने तिच्या घराबद्दल आणि इतर बदललेल्या दैनंदिन जीवनप्रवासाबद्दल सांगितले.
तेव्हा प्रार्थना म्हणाली की, “हे घर मी आणि माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने आणि मनापासून बनवलं आहे. त्यामुळे या घरासाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला थोडा त्रास झाला. मला वाटायचं की मुंबईत आपलं सगळं काम आहे आणि ते सगळं सोडून अलिबागला कायमचं कसं शिफ्ट व्हायचं? मी हे सगळं कसं सांभाळू शकेन असा मला प्रश्न पडला होता. पण खरं तर हे सगळं सांभाळणं खूप सोपं आहे हे मला नंतर कळलं.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “आमच्या या घरापासून १५ मिनिटांवर मांडवा आहे. तिथून मुंबईला जाण्यासाठी जेट्टी, बोट्स, रोरो मिळतात. रोरो मध्ये आपण आपली कार टाकून ४५ मिनिटांत मुंबईला पोहोचतो. त्यामुळे इथून मुंबईला पोहोचायला फक्त एक तास लागतो. मुंबईमध्ये ट्राफिकमधून कुठेही जायला साधारण आपल्याला तेवढाच वेळ लागतो त्यामुळे या एका तासाच्या प्रवासाचं फार काही वाटत नाही.”
प्रार्थनाच्या या व्हिडिओवर सध्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.