ओम राऊत दिग्दर्शित यंदाचा सर्वाधिक बहुचर्चित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा अखेर १६ जून रोजी प्रदर्शित झाला.
प्रदर्शनापूर्वीच काही ना काही कारणामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कधी ट्रेलर मधील डायलॉग, कधी एडिटिंग तर कधी कलाकारांची वेशभूषा. यामुळे या सिनेमाच्या चर्चांमध्ये प्रचंड वाढ झाली. फायनल ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकवर्ग हा सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता.
अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला अन् पहिल्याच दिवशी अगदी पहाटे पासूनच सिनेमा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. असे असले तरी हा सिनेमा बक्कळ कमाई करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. तसेच सिनेमा पाहिल्यानंतर प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभास आणि सीता माईची भूमिका साकारणाऱ्या क्रिती सेनॉनचे प्रचंड कौतुक झाले.
आदिपुरुषमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या क्रिती सेनॉनच्या निरागस अभिनयाचे खास कौतुक झाले. परंतू मुळातच क्रिती मेकर्सची पहिली पसंती नव्हती. तिच्या आधी या भूमिकेसाठी तीन अभिनेत्रींना विचारणा करण्यात आली होती. त्यांपैकी एक अभिनेत्री ही बॉलिवूडमधील तर उर्वरित दोन तेलुगु सिनेसृष्टीतील होत्या.
सीता माईच्या मुख्य भूमिकेसाठी सर्वप्रथम तेलुगु सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ‘किर्ती सुरेश’ हिला विचारण्यात आले. परंतू ती तेव्हा रजनीकांत यांच्या सोबत दुसऱ्या एका सिनेमात व्यस्त असल्यामुळे तिने आदिपुरुषमध्ये काम करण्यासाठी नकार दिला होता.
किर्ती सुरेशनंतर ही संधी नावाजलेल्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि अनुष्का शर्मा यांना मिळाली. मेकर्सकडून त्या दोघींनाही या सिनेमासाठी विचारणा करण्यात आली. परंतू त्यांनी देखील या भूमिकेसाठी नकार दिला. त्यानंतर शेवटी या सिनेमासाठी क्रिती सेनॉनला विचारण्यात आले अन् तिने या भूमिकेसाठी होकार दिला. जसा हा सिनेमा क्रिती सेनॉनच्याच नशिबात होता अन् तो तिला मिळाला.
एवढेच नाही तर तिने तिला मिळालेल्या या संधीचे सोने केले हे मात्र खरे. कारण आदिपुरुषमधील तिने साकारलेल्या या भूमिकेची आणि तिच्या कामाची पर्वणी आज थेट प्रेक्षकांकडूनच मिळत आहे.