बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ‘आलिया भट्ट.’ आलिया मागील १ वर्षापासून चांगलीच चर्चेत आहे. कधी तिच्या लग्नामुळे तर कधी लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच आई झाल्यामुळे. आलिया ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे वडील ‘महेश भट्ट’ हे मोठे चित्रपट निर्माते असले तरी आलियाने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आलियाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे केले आहेत.
आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. ती लवकरच ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया एका वेगळ्या रुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आलिया या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती या चित्रपटात अॅक्शन करताना देखील दिसून येणार आहे. आलियाला एका वेगळ्याच अंदाजात पाहायला प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहता हा सिनेमा संपूर्ण स्पाय थ्रिलर आणि अॅक्शनने भरलेला आहे. यामध्ये आलिया सोबत ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ फेम अभिनेता जेमी डॉर्नन आणि हॉलिवूडची वंडर वुमन गॅल गॅडोट दिसत आहेत. ट्रेलर पाहून आलियाच्या काही चाहत्यांनी तिच्या भूमिकेच्या कमी लांबीबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. तर काही चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. तसेच आलियाने गरोदर असताना या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे.
सध्या आलिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ब्राझीलमध्ये आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, सनी देओलचा ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हे तिन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. तसेच आलिया आणि रणवीर सिंगचा ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.