कोणत्याच गोष्टीला वयाची मर्यादा नसते तेच खरं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आता वयाचा ८० वर्षांचा टप्पा पार केला आहे. तरी देखील आज ते तारुण्याप्रमाणे तितक्याच जोमाने सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. तर या बिग बी यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या आगामी सिनेमाचं शूटींग सुरू आहे. मात्र या दरम्यानच सेटवरून एक काळजीत टाकणारी घटना समोर आली आहे. शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली आहे. सेटवरील त्यांच्या अपघाताची खबर अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि हे ऐकून सर्वांचीच चिंता वाढली होती.
परंतू बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून या घटनेची आणि त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तेव्हा ते म्हणाले की, “हैद्राबादमध्ये ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आता मी माझ्या घरी परतलो आहे. जखमी जागेवर पट्टी बांधण्यात आली आहे. शिवाय औषधोपचारही सुरू आहेत. वेदनाही होत आहे. हालचाल करण्यासाठी तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. प्रकृती सुधारण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागेल. या गंभीर दुखापतीमुळे माझी इतर कामही सध्या बंद आहेत. जोपर्यंत मी ठिक होत नाही तोपर्यंत माझं काम बंद राहील. सध्यातरी मी जलसामध्ये आराम करत आहे.”
तर दुखापतीनंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला आण्यात आले असून आता ते त्यांच्या निवास्थानी आराम करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’मधून अमिताभ बच्चन लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार असले तरी त्या व्यतिरिक्त जवळपास ६ चित्रपटांत पाहायला मिळणार आहे.