बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. टीझरपासूनच या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अॅनिमल हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरल्याच दिसून येत आहे. त्यामुळे रणबीरचे चाहते सध्या त्याच्यावर खूपच खुश आहेत.
रणबीर सोबत या सिनेमामध्ये बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट कलाकार झळकले आहेत. रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, यांसारखी तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवसापासूनच सिनेमा पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी झाली होती. अॅनिमलमध्ये रणबीरने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच बॉबी देओलने देखील सिनेमातील त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. त्याच्या या भूमिकेसाठी चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे.
बॉबीने काही हिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याला ट्रोल करण्यात आले. पण आत्ता मात्र अॅनिमल सिनेमातील त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक देखील थक्क झाले आहेत. या सिनेमामध्ये बॉबी देओलने मुक्या माणसाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या सिनेमात त्याच्या पात्राला एकही संवाद नाही. तरीही फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. तसेच त्याचा परफॉर्मन्सला अनेकांनी दाद दिली. अभिनयासोबतच सिनेमातील त्याचा फिटनेसदेखील अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मुक्या माणसाची भूमिका असली तरी बॉबी देओलला यासाठी देखील मेहनत घ्यावीच लागली. एका मुलाखतीत अभिनेत्याने या भूमिकेसाठी त्याला किती मेहनत करावी लागली याबाबत सांगितले, तेव्हा बॉबी म्हणाला की, “मला असं पात्र साकारायचं होतं, जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. अधिक आव्हानात्मक भूमिकेतून एक कलाकार त्याच्यातील सर्वोत्तम गोष्ट बाहेर आणू शकतो आणि माझ्यासोबत तेच झालं. ज्यावेळी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमात त्याचा एकही डायलॉग नाही हे सांगितलं त्यावेळी ऐकून हैराण झालो होतो. संदीपने तुझी भूमिका मुक्याची असल्याचं सांगितलं. सिनेमात म्यूट भूमिका असावी असं संदीपने सांगितलं.” त्यावेळी आधी हैराण झालो होतो, पण नंतर ही आव्हानात्मक भूमिका पार पाडण्याचं ठरवून, संदीपला होकार दिल्याचे अभिनेत्याने सांगितले.
तसेच ही भूमिका अत्यंत आव्हानात्मक असल्याचं बॉबी देओलने सांगितले. या भूमिकेसाठी त्याने एका महिन्यात साइन लँग्वेज शिकली. ही भाषा शिकल्यामुळेच मुक्याची भूमिका साकारताना मदत झाली, असेही त्याने सांगितले. त्यामुळे कोणतीच भूमिका सोपी नसते, प्रत्येकासाठी मेहनत ही घ्यावीच लागते आणि त्यानंतरच कौतुकाची थाप मिळते. आता सिनेमा पहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रेम आणि कौतुकाची थाप देखील मिळत आहे.