डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला अॅनिमल हा अवघ्या ३-४ दिवसांत प्रचंड गाजला. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, यांसारखी तगडी स्टार कास्टने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. तसेच कलाकारांनीच नाही तर या सिनेमात वापरण्यात आलेल्या ‘मशीन गन’ने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. अॅनिमलमधील रोमहर्षक सीनपैकी एक सीन म्हणजे रणबीर मोठ्या मशीनने शत्रूंवर हल्ला करतानाचा. हा सीन पाहून सारेच अवाक् होत आहेत. त्यामुळे ही मशीन आणि या संबंधित अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले.
आजवर आपण अनेक मराठी, हिंदी, तमिळ यांसारख्या अनेक सिनेसृष्टीतील सिनेमांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या बंदूकी आपण पाहिल्या आहेत. पण अशा प्रकारची बंदूक या आधी कधीच वापरली नसल्याचा दावा कला दिग्दर्शक सुरेश यांनी केला. त्यावरून ही मशीन परदेशातून आणली आहे असे अनेकांना वाटले, पण ही मशीन गन आपल्या मुंबईत बनवण्यात आल्याची माहिती सुरेश यांनी दिली. सुरेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या मशीनला ‘वाॅर मशीन गन’ असे नाव दिले आहे.
या बंदूकीविषयी बोलताना सुरेश म्हणाले की, “आम्ही प्रथम त्याची संकल्पना पेन्सिलमध्ये रेखाटून तयार केली. ते चार महिन्यांत पूर्ण झाले. ते तयार करण्यासाठी १०० कारागिरांना खास काम देण्यात आले होते. ही बंदूक लोखंड आणि स्टीलचा वापर करुन बनवली आहे. त्याचे एकूण वजन ५०० किलो आहे. ”शूटिंगमध्ये बंदूक हाताळण्याबाबतीत त्यांनी सांगितले की, “ही बंदूक हलवताना खूप त्रास होत होता. संपूर्ण शुटिंग दरम्यान आम्हाला बंदूक हलवायला खूप वेळ लागला. त्यात एक्सीलरेटर बसवण्यात आले होते, ज्यामध्ये कोणीही चढून गाडी चालवू शकते. तसेच त्यांनी बंदूक बनविण्यासाठीचा कालावधी आणि खर्च देखील सांगितला. तेव्हा ते म्हणाले की, “ही बंदुक बनवताना कन्सेप्ट, डिझायनर, अभियंता, सुतार, लेझर मेटल कटर आणि इलेक्ट्रीशियन उपस्थित होते. ते बनवण्यासाठी चार महिने लागले. पुतळा असता तर महिनाभरात बांधला असता, पण हे कामाचे मॉडेल आहे. ते बांधण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये लागले.”
सुरेश यांनी सांगितले की, लोक त्यांना विचारतात की ही बंदूक कुठून आणली. पण जेव्हा त्यांनी स्वतः ही बंदूक बनवली आहे असं सांगतात तेव्हा मात्र कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. शूटिंगसाठी तब्बल १२ हजार ते १६ हजार डमी बुलेट बनवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सिनेमामध्ये आणखीनच रंजकता आली. या बंदूकीची सवय व्हावी आणि वापरायला सोपी जावी म्हणून रणबीर दर महिन्याला रिहर्सलसाठी जायचा. त्यामुळेच आज आपण स्क्रीनवर त्याची बंदूकीसोबत ही भूमिका इतक्या आकर्षकपणे पाहत आहोत, आणि त्याकरिता भरभरून प्रेम देत आहोत.