मनसे अध्यक्ष मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर “मराठी पाऊल पडते पुढे” सिनेमाच्या पुर्नप्रदर्शनाच्या वेळेबाबत निर्णय घेणार – निर्माता प्रकाश बाविस्कर
“मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा सदयस्थितीत योग्यवेळी पुर्नप्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे याबाबत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीकरीता आजच मनसे नेते माजी आमदार श्री. जयप्रकाश बाविस्कर यांचेबरोबर मुंबई येथे सविस्तर चर्चा करण्यात आली.
“मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला होता. त्याचवेळी “द केरला स्टोरी” हा राजकीय प्रेरीत हिंदी चित्रपट ही प्रदर्शित झालेला होता. या चित्रपटाच्या समर्थनार्थ अनेकांनी प्रेक्षकांना मोफत तिकीटासह अल्पोपहार कुपनाची व्यवस्था केल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच चित्रपटगृहे समुहाने आरक्षित करण्यात आल्याचे दिसून येते. याचा प्रसार व समर्थन अनेक राष्ट्रिय व स्थानिक राजकीय पक्षांनी सुद्धा केले असल्याची बाब निदर्शनास येते. त्यामूळे ह्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सर्वच मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे व योग्य-शो ची वेळ मिळणे कठीण झाले आहे, ही बाब प्रेक्षकांना सोयीची नाही अशा अनेक तक्रारी निर्मात्याकडे प्राप्त झाल्या आहेत यामूळेच हा निर्णय घेतल्याचे समजते. या काळात एकाचवेळी अनेक चित्रपट मोठया प्रमाणात प्रदर्शित झाल्यामूळे जनतेच्या आवडीच्या वेळा आणि चित्रपट गृहे अनेक मराठी सिनेमांना उपलब्ध होऊ शकले नाहीत. शाळेच्या परीक्षा, काही शाळांना लागलेल्या सुटया त्याचप्रमाणे अनेक जण सुटयांमूळे देश-विदेश भ्रमण करीत असल्याने हा चित्रपट नंतर पुर्नप्रदर्शित करावा अशाही विनंत्या प्रेक्षकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या सर्व बाबींचा परीणाम चित्रपच्या प्रदर्शनावर दिसून आला. असे असले तरी चित्रपटाचा दर्जा आय.एम.डी.बी. वर ८.७ व बुक माय शो वर ८.५ दिसून आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर प्रेक्षकांनी चित्रपटासाठी उत्तम अशा प्रकारचे अभिप्राय दिलेले आहेत. गेल्या पाच दिवसात असा एकही अभिप्राय नकारात्मक दर्जाचा दिसून आला नाही. चित्रपटाची गाणी, कथा व चित्रपटाचे कलाकार हे उत्तम असल्याचे अभिप्राय आलेले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंतचा भारतातील शंभर टक्के निव्वळ नफा सामाजिक कार्यासाठी जाहीर करणारा हा एकमेव चित्रपट ठरला आहे. याची नोंद राष्ट्रिय स्तरावर व चित्रपट क्षेत्रात घेतली गेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर वर्तमानपत्रे, होर्डींग्ज, पोस्टर, स्टँडिज, प्रेस कॉन्फरन्स, रेडीओ इत्यादीवर मोठया प्रमाणात जाहीरात व प्रमोशन करणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळवणारा व तरुणांना उत्तम मार्गदर्शन करणारा चित्रपट ठरला आहे. महाराष्ट्रातील जनतेने चित्रपट पाहील्यांनतरच्या आतापर्यंतच्या आलेल्या प्रतिक्रीयातून हे स्पष्ट झाले आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन सदयस्थितीत चित्रपट पुर्नप्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपट निर्माता शिवलाईन फिल्म्स चे संचालक श्री. प्रकाश बाविस्कर यांनी घेतल्याचे सहनिर्माता श्री. चंद्रकांत विसपूते यांनी कळविले आहे. यानंतर मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांना भेटून सदयस्थितीबाबत चर्चा करुन योग्यवेळी पुर्नप्रदर्शन करण्याबाबतचा निर्णय तदनंतर घेणार असल्याचे सहनिर्माता श्री. चंद्रकांत विसपूते यांनी कळविले आहे.