असा एकही प्रेक्षक नसेल जो धक-धक गर्लचा दिवाना नसेल. जिची प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते अशी बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणजेच माधुरी दिक्षित नेने. पन्नाशी ओलांडलेल्या माधुरीच्या अदा आजही भूरळ पाडणाऱ्या आहेत.
सिनेसृष्टीत यशस्वीरित्या करियर करत असताना १७ ऑक्टोबर १९९९ रोजी माधुरीने डॉ. श्रीराम माधव नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. डॉ. नेने यांच्यासोबत लग्न केल्यानंतर माधुरी त्यांच्यासोबत अमेरिकेत राहायला गेली.
पण संसारातील तडजोडी तिलाही चुकल्या नाहीत. लग्नानंतर तिलाही अनेक आव्हानांना आणि परिस्थितीला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीमध्ये माधुरीने तिच्या या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
माधुरीने तिचं करिअर आणि नाव सर्व इथेच सोडून ती पतीसोबत अमेरिकेत संसार करू लागली. परंतू तिचे सुरुवातीचे दिवस फार अवघड गेले. डॉ. नेने यांच्या युट्यूब चॅनलवरील एका मुलाखतीत तिने सांगितले की, “पती पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्याच्या अस्थिर दैनंदिन जीवनासोबत जुळवून घेणे सुरुवातीला फार कठीण गेले. त्यांच्या रोजच्या जीवनाशी जुळवून घेणं फार अवघड होतं. डॉक्टर असल्यामुळे दिवस असो वा रात्र सतत कॉल्स यायचे. त्यावेळी हे सार फार कठीण होतं. कारण मुलांकडे मला एकटीलाच बघायला लागायचं. त्यांना शाळेत घेऊन जाणं, घेऊन येणं आणि इतर कामही मलाच करावी लागत होती.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “घरात एखादी चांगली-वाईट महत्वाची गोष्ट घडायची, पण त्यावेळी डॉ. नेने हॉस्पिटलमध्ये असायचे. मी आजारी असले तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये राहून इतर रुग्णांची काळजी घ्यावी लागायची. अर्थात त्यांच्या पेशाबद्दल मला आदर आहे. माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, कारण ते कोणाचा तरी जीव वाचवत आहेत. मला माहीत होतं की ती व्यक्ती मनाने खूप चांगली आहे. तुमच्या पार्टनरला ओळखणं खूप गरजेचं असतं. काही कठीण काळही होता, मात्र आम्हा दोघांना हे माहीत होतं की आम्ही जे काही करतोय ते चांगल्यासाठी करतोय आणि आम्हा दोघांनाही हे हवं आहे.”
जवळपास १० ते १२ वर्षे अमेरिकेत राहिल्यावर माधुरी तिच्या कुटुंबासोबत ऑक्टोबर २०११ मध्ये भारतात परतली.