कलाकार कधी काय करतील याचा काही नेम नाही. कधी स्वतःचा वेष बदलून लोकांमध्ये मिसळून त्यांच्या मनातलं जाणून घेतात, तर कधी आगळ्या-वेगळ्या भूमिकेसाठी वेगवेगळे स्टंट करतात. त्यासाठी ते स्वतःच्या शरीरावर आणि वेशभूषेवर सतत वेग वेगळे प्रयोग करत असतात. खास गोष्ट म्हणजे असे प्रयोग प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडतात. तर आता नुकताच असाच एक स्टंट आपल्या सर्वांचा लाडका शिव ठाकरे (Shiv Thakre) याने देखील केला.
प्रेक्षकांना हे स्टंट कितीही आवडत असले तरी कधी कधी कलाकारांच्या या स्टंटवर सडकून टीका देखील होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मराठमोळा अभिनेता वेष आणि चेहरा बदलून रस्त्यावर भिक मागताना दिसून येतोय. अनेकजण त्याचं हे विद्रुप रूप पाहून घाबरत आहेत, तर काही जण त्याच्यापासून लांब जात आहेत. पण शेवटी एका रिक्षावाल्याने त्याला पैसे दिलेच.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सगळ्यांचा लाडका, आपला मराठी माणूस शिव ठाकरे आहे. शिव ‘रिअॅलिटी शो’चा किंग म्हणून देखील ओळखला जातो. शिवने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. शिव हा मराठी बिग बॉस सिझन २ चा विजेता देखील झाला होता. बिग बॉस हिंदी १६ चा तो रनरअप ठरला. त्याने खतरों के खिलाडी, रोडीज अश्या मोठ-मोठ्या रिअॅलिटी शोचा तो भाग झाला आहे. तर सध्या शिव ‘झलक दिखला जा ११’मध्ये दिसत आहे. शिवचे चाहते आता फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर संपूर्ण भारतात त्याचे लाखो-करोडो चाहते आहेत.
शिव हा उत्तम डान्सर आणि अभिनेता आहे. शिवचे चाहते नेहमीच तो जे काही करेल त्यात त्याला साथ देत असतात. अशातच शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये शिव प्रोस्थेटिक मेकअप करून रस्त्यावर उतरला आहे. यात त्याच्या चेहऱ्यावर मोठ-मोठे फोड आलेले दाखवले आहे. तो सगळ्यांकडे जाऊन भिक मागताना दिसून येतोय काहीजण त्याला खूप घाबरतायत तर काही लोक त्याच्यापासून लांब पळत आहेत. कधी एका शोरूम बाहेर जाऊन बसलेला असताना तिथला सिक्युरिटी गार्ड त्याला पळवून लावतो. तर एक महिला त्याला बघून घाबरते आणि ओरडू लागते. पण व्हिडीओच्या शेवटी एक रिक्षावाला शिवला पैसे देतो आणि हा क्षण सर्व नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
शिवने पोस्ट शेअर करत तो हा सगळा प्रँक करत असल्याचे सांगितले. त्याच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, “प्रँक असा करा की सगळेजण घाबरले पाहिजेत.” तर दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, “रिक्षावाल्या काकांनीमन जिंकलं.” तर काहींनी “शेवटी मराठी माणूसच मदत करतो.” अशी कमेंट केली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शिवचीच हवा आहे.