संकर्षण कऱ्हाडे कविता: संकर्षण कऱ्हाडे हा मराठी कलाकार असून तो एक उत्तम कवी देखील आहे. मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत त्याने समीर हे पात्र साकारलं होतं त्याची समीर ही भूमिका देखील चांगलीच गाजली होती. बऱ्याचदा तो सूत्रसंचालकाचं काम देखील करताना दिसून येतो. मराठी कलाविश्वात त्याने स्वतःच एक वेगळच स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या कवितांचे देखील खूप फॅन आहेत.
खूप दिवसांपासून त्याचे चाहते त्याच्या कवितांची आतुरतेने वाट पाहत होते. खूप दिवस झाले संकर्षणने एकही कविता केली नव्हती. कधी तो त्याच्या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असायचा तर कधी इतर कामांमुळे त्याला कविता करायला वेळच मिळायचा नाही.
खूप दिवसानंतर संकर्षणे एक कविता केली आहे. ही कविता त्याने ‘महाराष्ट्राची किचन क्वीन’ या कार्यक्रमात सादर केली. यावेळी त्याने ‘मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय’ यावर खूपच सुंदर कविता सादर केली. ती ऐकून उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले.
View this post on Instagram
संकर्षणने सादर केलेली कविता (संकर्षण कऱ्हाडे कविता):
“अरे आताच नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला,
रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी तुम्ही मला बाबा केला
नऊ महिने त्या गोड बातमीत मी अजूनही सुखावतोय,
इकडे बोळक्यात तुमच्या वर-खाली दुधी दात डोकावतोय
बरं खोटं रडून बोलवता येते आता जवळ तुम्हाला माय,
मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय
कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटणाने म्युझिक वाजतं,
किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं बाहुलं नाचतं
पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं,
जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबरायचं नसतं
बरं दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा-बाय बाय,
मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय
भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कोणाला घ्यायचं,
स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडं आम्ही कोणाशी बोलायचं
हळूहळू सुटेल तुमची दुभट, घुटी लंगोटी,
येणार नाही रे मग चिऊ काऊ दाणा खाण्यासाठी
मग बोटं सोडूनही पडेल तुमचं आता घराबाहेर पाय,
मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय….!!”
संकर्षणच्या या कवितेवर अनेक कलाकारांनी प्रेम दाखवत कमेंटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कवितेवर शशांक केतकरने “अरे बाबा किती खरं लिहीशील. आत्ता समोर असतास तर कडकडून मिठी मारली असती तर अभिनेत्री तेजस्वी पंडितने “मित्रा लव्ह यू, किती सुरेख रे” अशी कमेंट केली. तसेच त्याच्या चाहत्यांनी देखील या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.