मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (Sayali Sanjeev). सायलीने तिच्या अभिनयातून स्वतःचं असं वेगळ स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने चाहत्यांवर छाप तर पाडलीच आहे, पण तिचं सौंदर्य देखील एखाद्याला लाजवेल असं आहे.
तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. ‘काहे दिया परदेस’या मालिकेतून सायली घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिची गौरी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. तसेच या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता देखील मिळाली. त्यानंतर तिने शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत देखील काम केलं. तसेच तिने बस्ता, आटपाटी नाईटस, झिम्मा, झिम्मा २, सातारचा सलमान, मन फकीरा, हर हर महादेव आणि गोष्ट एका पैठणीची या चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’या चित्रपटाला ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान देखील मिळाला.
सायली तिच्या प्रत्येक मतावर नेहमीच अगदी रोखठोक बोलताना दिसून येते. सायलीचं अनेकदा भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याच्यासोबत नाव जोडलं गेल. पण तिने प्रत्येकवेळी ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’ असे सांगितले. पण यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. अखेर ऋतुराजने उत्कर्षा हिच्याशी लग्नगाठ बांधून या सगळ्या चर्चांना पुर्णविराम दिला.
तर आता परत एकदा सायली तिच्या वैक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसून आली आहे. यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘विंग्ज २०२४’ या कार्यक्रमाला सायली उपस्थित राहिली होती. या दरम्यान सायलीला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी सायलीला “तुला मोठ्या पडद्यावर एका शेतकऱ्याची भूमिका साकारायला मिळाली तर तू करशील का?” असं विचारण्यात आले. त्यावर सायली म्हणाली, “जगाच्या पोशींद्याला त्याची जीवनयात्रा संपवावी लागणे, हे खरोखरच दुर्दैवी आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाचून वाईट वाटते. माझी आई विदर्भातील अकोल्याची असल्याने या भागाशी विशेष जिव्हाळा आहे. आजोबा शेती करायचे. मात्र, शेतकऱ्यांचे जगणे प्रत्यक्ष बघता आले नाही. संधी मिळाल्यास शेतकऱ्यांचे जगणे अभिनयातून मांडायला आवडेल.”
पुढे “तुला शेतकरी नवरा चालेल का?” यावर सायली संजीव म्हणाली, “शेतकरी जोडीदार आयुष्यात असल्यास मला ते नक्कीच आवडेल.” त्यामुळे सायलीला आता कसा नवरा पाहिजे हे तर स्पष्ट झालं आहे. चाहते देखील सायलीच्या लव्हलाईफबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.