मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule). शून्यातून वर येत हृताने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर साऱ्यांचेच मन जिंकले. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रांत उत्तम कामगिरी करत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
एकामागोमाग एक मिळणाऱ्या मालिका आणि सिनेमाच्या घवघवीत यशानंतर आता हृताचा आणखी एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तो सिनेमा म्हणजे ‘कन्नी.’ हृताचा हा सिनेमा येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून हृता सध्या या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिने अनेक मुलाखती दिल्या, यावेळी तिने तिच्या खासगी आणि करिअर संबंधित अनेक नवनवीन गोष्टींचा खुलासा केला.
View this post on Instagram
गेल्या वर्षी हृताने मुंबईत स्वतःचे घर घेतले. लग्नानंतरही तिने घर घेण्यामागचे खरे कारण विचारले असता हृता म्हणाली की, “मी कधीच स्वत:च्या घरात राहिलेली नाही. गेली ३० वर्षं मी आई-बाबांबरोबर भाड्याच्या घरात राहत आले आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास ११ घरं बदलली आहेत. मला फार मोठं घर नको होतं. पण, मला नेहमी असं वाटायचं की, उद्या माझं लग्न झाल्यानंतर आपलं एक हक्काचं घर असावं, जिथून माझ्या आई-वडिलांना कुणी काढून टाकणार नाही.”
तसेच यावेळी तिला बोल्ड सीन करण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. बोल्ड किंवा रोमँटिक सीन हिंदी मालिकेच्या किंवा सिनेमाच्या पडद्यावर पाहताना सर्वांना एक पाऊल पुढे आल्यासारखे वाटते. त्याचे प्रेक्षकही भरभरून कौतुक करतात. परंतू जेव्हा असे सीन मराठी मालिका किंवा सिनेमाच्या पडद्यावर साकारण्यात आले, की मात्र त्या कलाकारांना ट्रोलर्सचा सामना कारावा लागतो. पण असे सीन करताना आपले लाडके कलाकार नक्की काय विचार करतात हे जाणून घेण्यास आपण सर्वच उत्सुक असतो. तर यावर आता हृता देखील खूपच स्पष्टपणे व्यक्त झाली.
तेव्हा ती म्हणाली की, “मी लोकांचा विचार करुन कधीच निर्णय घेतला नाही. म्हणजे मला तशी गरजच वाटली नाही. सर्किटमध्येच फक्त मी आणि वैभव आहोत जे एक प्रोजेक्ट आऊट झालंय, बाकी दोन यायचे आहेत. पण मी लोकांचा कधीच विचार केला नाही. पण जेव्हा असं काही असेल तेव्हा मी विचारते की ‘हे गरजेचं आहे का? गरज आहे का? हे गाळलं तर चालेल का? हे मी स्पष्ट विचारते. पण गरज असेल तर मी लोकांचा विचार करत नाही.”
तर आता सारेजण हृताच्या आगामी कन्नी या सिनेमासाठी आणि सिनेमात हृता आणि अजिंक्य राऊत यांची कमाल जोडी पुन्हा एकदा पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.