भारतीय सिनेसृष्टीला अनेक कमालीचे कलाकार लाभले आहेत. काहींनी आपल्या अभिनयाने, काहींनी आपल्या गायनाने, काहींनी आपल्या नृत्याने तर काहींनी आपल्या निरनिराळ्या कलेतून सातासमुद्रापार असलेल्या रसिक प्रेक्षकांचे देखील मन जिंकले आहे. त्यात आपल्या अनेक मराठमोळ्या कलाकारांचा समावेश आहे. असा नट पुन्हा होणे नाही असं आवर्जून आपल्या सर्वांच्या तोंडातून निघते, ते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde) यांच्यासाठी.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांच्या दोन्ही मुलांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात केली आहे. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे. अभिनयने आजवर ‘ती सध्या काय करते’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बांबू, बॉईज ४’, ‘अशी ही आशिकी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनय करून स्वतःचा नवा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याने त्याच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवलाच. तर त्या पाठोपाठ आता लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिचे देखील आता रुपेरी पडद्यावर आगमन झाले आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडून प्रेरणा घेत स्वानंदीने सुरुवातीला नाटक आणि एकांकिकेतून तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीनेही नाटकातूनच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले. तर त्यानंतर आता ‘मन येड्यागत झालं’ या सिनेमातून स्वानंदी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकत आहे. हा तिचा पाहिलाच सिनेमा असून हा सिनेमा १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी म्हणजेच स्टार किड हा शब्द आपसूक आपण वापरतोच. पण स्टार किड असलं की, त्याचा त्यांना फायदा होतो की तोटा हे तेच जाणे. पण अनवधानाने त्यांच्यावर एक जबाबदारी मात्र नक्कीच येऊन पडते. तर सिनेसृष्टीत काम करताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नेपोटिझम या बाबतीत बोलताना स्वानंदीने आपले मत मांडले. तेव्हा ती म्हणाली की, “खर सांगू तर मी इंडस्ट्रीत येण्याआधी काहीचं ठरवलं नव्हतं. मला खूप दबाव वाटायचा कधी-कधी. पण आता तसे नाही. आता काळानुसार ते कमी होतं गेलं आहे.”
हे देखील वाचा: सिध्दार्थ जाधवच्या पोस्टने वेधले लक्ष म्हणाला, “हे पहिल्यांदाच घडतंय…”
तसेच स्वानंदी बेर्डे पुढे म्हणाली की, “सुरुवातीला मी अभिनेत्री न होण्याचं ठरवलं होतं. कारण, खूप दवाब असतो आणि नेपोटिझमवर खूप भाष्य केलं जातं. इंडस्ट्रीत काम करताना एक अभिनेत्री आणि ‘स्टार किड’ म्हणून स्व:ताला सिद्ध करावं लागतं. मला तो दबाव नको होता. पण, आता मला वाटतं की ते सर्व करु शकते. माझ्यामध्ये ती गोष्ट आहे. म्हणून मी माझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.”
‘मन येड्यागत झालं’ या सिनेमातून सिनेमात स्वानंदी मुख्य भूमिकेत साकारत असून अभिनेता सुमेध मुदगलकर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला. स्वानंदी आणि सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार देखील झळकले आहेत.