सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या अनेक सोशल मिडिया चैनल्सवर ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या गाण्यावर अनेक कलाकार तसेच रील्स स्टार सुद्धा व्हिडीओ बनवताना दिसून आले. या गाण्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे.
हे गाणं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील असून गुरु ठाकूर यांनी हे गाणं लिहीले आहे. श्रेया घोषाल हिने हे गाणं गायलं असून अजय-अतुल यांनी ते गाणं संगीतबद्ध केले आहे. ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन कृति महेशने केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध रील स्टार किली पॉल आणि त्याची बहिण निमा पॉल यांनाही या गाण्याची भूरळ पडली आहे. नुकतंच त्यांनी या गाण्यावर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये किली पॉल आणि त्यांची बहिण हुबेहूब स्टेप फॉलो करताना दिसत आहेत. अभिनेत्री सना शिंदे प्रमाणे तिने या गाण्यातील स्टेप फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ती या गाण्याचे लिप्सिंगहि करत आहे. ते दोघे नेहमीच भारतीय व बॉलिवूड गाण्यांवर रील्स बनवत असतात. आत्ता नुकतीच त्यांनी ‘बहरला हा मधुमास नवा’ या लोकप्रिय गाण्यावर रील्स बनवुन “मला गाणे आणि डान्स दोन्हीही फार आवडले .” असे कॅप्शन दिले आहे.
त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. काही जणांनी त्या व्हिडिओवर खूप चांगल्या कॉमेंट्स देखील केल्या आहेत. ‘जय महाराष्ट्र’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “भाऊ तू आमच्या मराठी प्रेक्षकांना खुश केल्याबद्दल तुला प्रेमाचा जय महाराष्ट्र”, असे म्हटले आहे. ‘नीमा ताई तुम्ही फार छान डान्स केलात आणि किली भाऊ तुम्हीही’, अशी कमेंट एकाने केली आहे. अनेक मराठी प्रेक्षकांनी त्यांच्या या व्हिडीओला चांगलीच दाद दिली आहे.