मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायम राज्य करणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या. लक्ष्या आज आपल्यात नसूनही त्याच्या सदाबहार चित्रपटांमुळे, नाटकांमुळे तो कायम आपल्यातच आहे असं जाणवतं.
लक्ष्याचे चित्रपट आजही प्रेक्षक त्याच उत्सुकतेने पुन्हा पुन्हा पाहत असतात. त्याची चर्चा तेव्हाही होतीच आणि आत्ताही आहेच. सध्या लक्ष्याचा एक मुलाखती दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेसह त्याची पत्नी प्रिया बेर्डे देखील आहे. हा व्हिडिओ जोडी नं. १ या कार्यक्रमातील असून ही मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस घेताना दिसत आहे. या मुलाखतीत रेशम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारत आहे आणि त्यावर लक्ष्याने नेहमीप्रमाणे एकदम मजेशीर उत्तरे दिली आहेत.
यादरम्यान रेशमने लक्ष्याला विचारले की, “प्रिया यांना दिलेले पहिले गिफ्ट कोणते?” त्यावर लक्ष्याने उत्तर दिले की, “मी तशी खूप गिफ्ट दिली आहेत. पण पहिलं गिफ्ट होतं ती साडी.” तसेच लक्ष्याने रेशमच्या ईतर सर्व प्रश्नांची उत्तरे देखील अचूक दिली.
त्यांचा हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून प्रेक्षकही त्यावर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.