एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील संपूर्ण जीवन कलेसाठी घालवतो. कलेसाठी, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्या कलाकाराचा असलेला प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो. अनेक वर्ष असाच प्रामाणिकपणा दाखवत साऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेतून व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं.
काही चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. प्रत्येक सिनेमातील त्यांची काही पात्र विशेष गाजली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी देखील खूप गाजली. त्यांच्या या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
View this post on Instagram
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांचं कौतुक केलं जातंय. पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ त्यांच्या भावना व्यक्त करत म्हणाले की, “माझ्या मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजवर ज्या थोर लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे आज मला त्यांच्या बरोबरीने नेऊन बसवलं आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं मी समजतो. गेली ५० वर्षं मी चित्रपट, नाटक, मालिका करतोय त्यातली मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली अन् प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली त्याचा मला प्रचंड आनंद आहे”, असं अशोक सराफ म्हणाले.
मराठी म्हणू नका, हिंदी म्हणू नका. अगदी भोजपुरी सिनेमांनाही अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने अक्षरश: सजवलं. कधी नायक, कधी सहनायक तर कधी खलनायक अशा भूमिकांची तोरणं त्यांनी मनोरंजन विश्वावर बांधली. महत्त्वाचं म्हणजे, फक्त अभिनयच नाही तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये गाणीही गाऊन, प्रेक्षकांना सूरमयी अनुभव दिला. अशा या चौफेर मुशाफिरी करणाऱ्या, महान अभिनेत्याचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलायं.
अशोक सराफ हे २०२३ मधील जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी देखील ठरले होते. या सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा जीवन प्रवास उलगडत अनोखी मानवंदना दिली होती. आपला परफॉर्मन्स सादर करून झाल्यावर सिद्धार्थ जाधव भावूक होऊन मंचावरुन खाली उतरला. त्याने हातातील फुलांचा हार अशोक सराफ यांना घातला अन् तिथेच त्याने अशोक सराफ यांना साष्टांग दंडवत देखील घातला.
प्रोफेसर धोंड, धनजंय माने, इन्स्पेक्टर सर्जेराव, नवकोट नारायण, बाजीराव रणगाडे, गोपूकाका, लुकतुके, यांसारख्या अजरामर कलाकृतीला जन्म देणाऱ्या अशोक सराफ यांना मानाचा मुजरा.
Read More : Kriti Kharbanda and Pulkit Samrat’s Roka Ceremony Sparks Excitement Among Fans