मराठी कलाविश्वात काम करताना कलाकाराचा एखादा सिनेमा, मालिका किंवा एखादी भूमिका इतकी लोकप्रिय होते की, प्रेक्षक कलाकारांना त्याच नावाने किंवा त्यांच्या त्याच कामाने कायम स्मरणात ठेवतात. आपल्या आठवणीत कोरलेली अशीच एक बालकलाकार म्हणजे मायरा वैकुल (Mayra Vaikul).
काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली पण आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे यांसारख्या अनेक दमदार कलाकारांनी गाजवलेल्या या मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे. या मालिकेतून आणखी एक नवा आणि गोड चेहरा मनोरंजन विश्वाला मिळाला, तो चेहरा म्हणजे ‘परी’ ही भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वैकुलचा. इतक्या कमी वयातही उत्तम अभिनय आणि भूमिकेतील निरागसता टिकवून तिने केलेले काम खरंच वाखाण्याजोगे आहे. या मालिकेमुळे मायराला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तसेच यातून तिला मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग देखील मिळाला.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेनंतर लगेच मायरा ‘नीरजा’ या हिंदी मालिकेत झळकली. एवढ्या कमी वयात मायराच्या कामाची प्रशंसा होवू लागली. त्यातूनच आता तिने मोठे पाऊल टाकले आहे. सोशल मीडियापासून प्रसिद्धी मिळवत मालिकांमध्ये झळकलेली मायरा आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मायरा ‘नाच गं घुमा’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असून हा मायराचा पहिला वहिला सिनेमा आहे.
नुकताच जागतिक महिला दिन पार पडला, याच दिनाचे औचित्य साधत नाच गं घुमा या सिनेमाची घोषणा झाली. झिम्मा २ आणि बाईपण भारी देवा या महिलांसाठीच्या खास सिनेमांनंतर आता पुन्हा एकदा महिलांना केंद्रित करणारा आणखी एक नवा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले, त्यानुसार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा परेश मोकाशी सांभाळणार आहेत. तर परेश आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे. नाच गं घुमा या आगामी सिनेमात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, नम्रता संभेराव, आशा गोपाल असे तगडे कलाकार झळकणार आहेत. यातच आपली छोटीशी आणि गोड मायरा देखील आहे.
View this post on Instagram
या सिनेमाची घोषणा करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत… ‘नाच गं घुमा.’”
या सिनेमातील मायराची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसली तरी, मायराचा पहिला सिनेमा म्हणून सर्वच या हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.