आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलं आहे की, मोठ-मोठ्या लोकांना तसेच अनेक कलाकारांना जीवेमारण्याची धमकी मिळत असते. आता देखील असंच काहीसं झालं आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘भारतीय महसूल सेवा’ अधिकारी आणि ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी ‘क्रांती रेडकर’(Kranti Redkar) हिला नुकतीच जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. क्रांतीला याआधी देखील अनेकदा धमकी मिळाली आहे.
यावेळी तिला पाकिस्तानी आणि ब्रिटीश नंबरवरून व्हाॅट्सअपवर अश्लील मॅसेज आले आहेत. तिला या नंबरवरून अनेकदा काॅल देखील आले आहेत. याची माहिती क्रांतीने ट्विट करत दिली आहे. ६ मार्चपासून क्रांतीला धमक्या येत आहेत. ट्विट करत क्रांती म्हणाली की, “गेल्या एक वर्षापासून सतत जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. मला माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि यूके नंबरवरून जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे सगळं सुरु आहे. याबाबत पोलिसांना नियमितपणे माहिती दिली आहे.”
या पोस्टमध्ये क्रांतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं. याबाबत क्रांतीने गोरेगावमधील पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. यावर पोलीस उपायुक्त आनंद भोईत म्हणाले आहेत की, “मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, आणि पाकिस्तानी नंबरवरून अश्लील संदेश येत आहेत, समीर वानखेडे यांच्या पत्नीने गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.”
क्रांतीला मागील वर्षी अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीमच्या नावाने देखील धमकी देण्यात आली होती. ट्विटरवर बनावट अकाऊंट बनवून ही धमकी देण्यात आली होती. वानखेडे कुटुंबाला अनेकदा अशा धमक्या येत असतात. पण यावेळी पहिल्यांदाच क्रांतीला अश्लील मॅसेज आणि धमकी आली आहे. यामुळेच अनेकदा तक्रार करून सुद्धा पोलीस यावर काही ठोस कारवाई करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे क्रांतीला तिचं कुटुंब असुरक्षित वाटतं आहे. तर आता या गहन विषयामुळे क्रांती रेडकर चर्चेचा विषय ठरली आहे. आता पोलीस यावर नक्की काय कारवाई करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.