मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे त्यांच्या उत्तम चित्रपटांमुळे ओळखले जातात. तसेच त्यांनी आत्तापर्यंत एकाहून एक तगडे सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॅन्ड्री’ या सिनेमामुळे नागराज यांना खरी ओळख मिळाली. पण २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट या सिनेमामुळे नागराज यांना भरपूर लोकप्रियता मिळाली.
सैराट हा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील पहिलाच सिनेमा होता जो इतका सुपरहिट ठरला आणि या सिनेमाने जवळपास १०० कोटींच्यावर कमाई केली होती. त्यानंतर नागराज यांनी अनेक दमदार सिनेमे सिनेसृष्टीला आणि प्रेक्षकांना दिले. फॅन्ड्री आणि सैराटनंतर नाळ, नाळ २ त्यांचे हे सिनेमे देखील प्रचंड गाजले. पण मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या घर बंदूक बिर्याणी या सिनेमाला म्हणावी तितकी पसंती मिळाली नाही. नागराज हे नेहमीच वेगळ्या विषयावर सिनेमे घेऊन येत असतात.
मराठी सिनेसृष्टीसोबतच नागराज यांनी बॉलिवूडमध्ये देखील त्यांचं वर्चस्व निर्माण करण्याची तयारी सुरु केली आहे. २०२२ साली ‘झुंड’ या सिनेमातून नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. तर आता नागराज मंजुळे म्हणजेच सर्वांचे लाडके अण्णा ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडून काही सिनेमे आणि वेब सिरीजची घोषणा करण्यात आली. यावेळी नागराज यांच्या ‘मटका किंग’ या सिरीजची देखील घोषणा झाली.
View this post on Instagram
मटका किंग या आगामी सिरीजची निर्मिती रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर प्रोडक्शन करणार असून नागराज मंजुळे, सिध्दार्थ रॉय कपूर, आशिष आर्यन आणि अश्विनी निडवानी हे या सिरीजचे निर्माते असणार आहेत. तसेच नागराज मंजुळे आणि अभय कोरणे यांनी या सिरीजचे लेखन केले आहे. आणि स्वतः नागराज हे या सिरीजचे दिग्दर्शन देखील करणार आहेत. तसेच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
मटका किंग ही सिरीज रतन खत्री यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. यात मुंबईतील ६०-७० च्या दशकातील काळ दाखवण्यात आला आहे. मुंबईतील एक कापूस व्यापारी कशाप्रकारे मटका किंग बनतो हे या सिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. नागराज मंजुळे सध्या त्यांच्या ‘खाशाबा’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे ही सिरीज प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण २०२४ च्या शेवटी ही सिरीज प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.
तसेच ‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने या सिरीज सोबत आणखीन मोठमोठ्या सिरीजची घोषणा केली आहे. यामध्ये मिर्झापूर ३, द फॅमिली मॅन ३, स्त्री २ आणि पंचायत ३ यांसारख्या अनेक सिरीजचा समावेश आहे.