मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आजवर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तसेच आजचे नवोदित कलाकारही त्यांचे प्रचंड चाहते आहेत, तर काही त्यांना आदर्श म्हणून बघतात. त्यांचे अनेक चित्रपट आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहतात. त्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनोखी शैली आणि अभिनयावर त्यांनी मिळवलेला ताबा यामुळे त्यांना मराठी सिनेसृष्टीत एक उत्कृष्ट विनोदवीर म्हणून ओळखले जाते.
तसेच गेली अनेक वर्ष आपल्या विनोदातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे आणि प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या या अनमोल कामगिरीबद्दल नुकताच त्यांना ‘शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचा आनंद साजरा होत असतानाच आणखी एक आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे यंदाच्या अभिनय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराची.
शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे पुरस्काराच्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल अशी घोषणा झाली. घोषणा केल्यानंतर अशोक सराफ यांनी नेहमीप्रमाणे हात जोडले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. या कार्यक्रमादरम्यान अशोक यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत ते म्हणाले की, “आजचा सत्कार मी कधीही विसरु शकत नाही. कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला प्रेक्षकांकडून मिळणारे पाठबळ फार महत्वाचे असतात. त्याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. मला कायमच असे पाठबळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दिलं.”
आत्तापर्यंत अशोक सराफ यांनी सिनेसृष्टीमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारल्या आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘भुताचा भाऊ’, ‘अफलातून’ यांसारख्या असंख्य सिनेमांतून त्यांनी लाखो सिनेप्रेमींच्या ह्रदयात घर केलं आहे. अशा या अष्टपैलू कलाकाराला यंदाचा पद्मश्री पुरस्कार मिळणार का? याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.