इंजिनिअरींग केल्यानंतर चांगला जॉब मिळावा म्हणून थोडे दिवस इतर काहीतरी उद्योग करत बसणारे अनेक लोक आहेत. अशाच एका इंजिनिअरची गोष्ट पंचायतमध्ये सुरु होते. इंजिनिअरींग झालेला अभिषेक फुलोरा गावात पंचायत सचिव म्हणून रुजू होतो आणि सुरुवात होते त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक वादळांची.
या फुलोरा गावातील माजी सरपंच ब्रिज भूषण दुबे, सध्याची असलेली सरपंच मंजू देवी, प्रल्हाद पांडे, अभिषेकचा मित्र असलेला प्रतिक, फुलोरा गावात अभिषेकला नेहमीच नडणारा भूषण, अभिषेकला कायम पाठिंबा देणारा सचिव सहाय्यक विकास या सगळ्यांच्या जोडीने रंगलेली ही पंचायत सिरीज खूपच गाजली. आधीच्या भागात कंटाळलेला अभिषेक कसा या गावातील लोकांमध्ये मिसळत जातो आणि गावच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो अशी कथा असलेली या वेबसिरीजचे दोन भाग आधीच प्रदर्शित झाले असून या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
आता पंचायतचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅमेझोन प्राईमने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना ही बातमी दिली आहे. पंचायत ३ चा फर्स्ट लुक पाहून सर्वजण तिसऱ्या भागासाठी उत्सुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या सिझनचे चित्रीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच मंजू देवी म्हणजेच नीना गुप्ता यांनी सांगितली. याचा फर्स्ट लूक समोर आला असला तरी या सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. फर्स्ट लूक पाहून चाहते आता सिझनची आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वी कोरोना काळात या सिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.
जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, फैजल मलिक, चंदन रॉय, सांविका अशी तगडी कास्ट असलेली ही सिरीज तेव्हा खूपच लोकप्रिय ठरली. गावातील जीवन, तिथे असलेल्या समस्या, तिथल्या लोकांचा जिव्हाळा या सगळ्यावर भाष्य करत या सिरीजने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलय. गजब बेइज्जती है यार! या डायलॉगने तर मिम्सचा पाऊसच पडला आहे. काळजाला भिडणारे असे अनेक डायलॉग या सिरीजमध्ये आहेत. पुन्हा एकदा तिसऱ्या भागाचा फर्स्ट लूक आऊट करताना ‘ठोकर लगती है तो दर्द होता है, तभी मनुष्य सिख पाता है.’ या डायलॉगचा पोस्टर लाँच केला आहे. कॉमेडी म्हणून सुरु झालेल्या या सिरीजने कधी आपल्या काळजाला हात घातला हे समजल सुद्धा नाही.
तिसरा सिझन देखील असाच असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पंचायत ३ साठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.