आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर’ सिनेमा गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला होता. तर आता प्रेक्षक सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या सिनेमात ‘प्रसाद ओक’ने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातून आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. आनंद दिघे आणि ठाण्याचं एक वेगळचं नातं आहे. टेंभीनाका येथील देवीच्या उत्सवाची सुरुवातही त्यांनीच केली.
नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील ठाण्यातील टेंभीनाका परिसरात नऊरात्री उत्सव अगदी जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदा टेंभीनाक्याच्या दुर्गेश्वरी देवीच्या उत्सवाला राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दरवर्षी दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दी होत असते. तसेच टेंभीनाका येथील देवीच्या दर्शनासाठी अचानक आनंद दिघे आले आणि त्यांना पाहायला गर्दी झाली. त्यामुळे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. आनंद दिघे म्हणजेच भगवी वस्त्रे परिधान करून अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या रुपात ठाण्यात आला होता.
View this post on Instagram
प्रसाद ओकला प्रत्यक्ष दिघे साहेबांच्या रुपात पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच तो देवीची महाआरती करत असताना त्याच्या आजूबाजूला लहान मुलं उभी असल्याचे व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी आलेला प्रत्येकजण प्रसादकडे अगदी आश्चर्याने पाहत होते. तसेच प्रसादला या रुपात अनेकांचे डोळे भरून आले, तर प्रत्येकाने त्याला आदरपूर्वक नमस्कारही केला.
अभिनेता प्रसाद ओकने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर प्रसादने लिहिले की, “मा. गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या रुपात आईचं इतक्या जवळून दर्शन मिळणं हे मी माझं परमभाग्य समजतो. काल देवीचे आशीर्वाद घेऊन धर्मवीर २ चा मुहूर्त शॉट घेतला. चित्रीकरण लवकरच सुरु होईल. पहिल्या भागाइतकंच प्रेम आपण दुसऱ्या भागावरही कराल अशी आशा करतो.” दरम्यान अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘धर्मवीर २’ हा बहुचर्चित चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्गातही आनंदाचे वातावरण आहे.