छोट्या पडद्यावर प्रचंड चर्चेतील रिॲलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस.’ हिंदी बिग बॉसनंतर या शोने मराठी भाषेतही चांगलीच लोकप्रियता मिळवली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या ट्रॉफीवर अभिनेत्री मेघा धाडे हिने नाव कोरले. तर तिच्या पाठोपाठ अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakre) याने देखील बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात बाजी मारली.
मेघा आणि शिवनंतर तिसऱ्या पर्वात अभिनेता विशाल निकम तर चौथ्या पर्वात अक्षय केळकर याने विजेत्यापदाचा मान पटकावला. बिग बॉस मराठीचे विजेतेपद पटकावल्यावर विजेत्यांना बक्षीस म्हणून नक्की काय मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. ९९ दिवसांचा अतीतटीचा खेळ संपल्यावर १०० व्या दिवशी होणाऱ्या बिग बॉस सोहळ्याच्या महाअंतिम सोहळ्यात विजेत्या स्पर्धकाचे नाव आणि त्याचे खास बक्षीस देखील घोषित केले जाते. यावेळी त्यांना रोख रक्कमेसोबत गाडी किंवा इतर कोणतीही महागडी वस्तू दिली जाते. पण हे खरंच त्यांना मिळतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
बिग बॉस मराठीच्या विजेत्याला ट्रॉफीसह एकूण २५ लाख रुपये इतके बक्षीस मिळते. पण दुसऱ्या पर्वाच्या विजेत्याला म्हणजेच अभिनेता शिव ठाकरे एकूण रक्कम फार कमी मिळाली होती, अशी बाब स्वतः शिवने सांगितली. शिवने नुकतीच एक मुलाखत दिली, तेव्हा त्याचे बरेच पैसे कापल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला. शिवने मराठीसह हिंदी बिग बॉसमध्येही नाव कमावले आहे. त्यामुळे त्याला मराठी आणि हिंदी अशा दोन्ही बिग बॉसचा चांगलाच अनुभव आहे. तसेच दोन्ही इंडस्ट्रीमध्ये त्याचे चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्यामुळे तो वारंवार मुलाखती देताना दिसतो. तर आता शिवने नुकतीच हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. तेव्हा त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केले.
तर बिग बॉसच्या बक्षीसी रक्कमेबद्दल बोलताना शिव म्हणाला की, “मला हिंदीमध्ये गेल्यावर कळलं की लोकांना खूप पैसे मिळतात. कारण मराठी बिग बॉसमध्ये मला २५ लाख रुपये मिळाले होते. पण कार्यक्रमाच्या दोन तास आधी निर्मात्यांनी त्यातली आठ लाख रुपये रक्कम कमी केली. त्यामुळे ती रक्कम १७ लाख रुपये झाली. पण माझ्या अकाऊंटवर फक्त ११.५ लाख रुपये जमा झाले. नंतर मला कळालं की, यामधून माझ्या कपड्यांवरचे, आईबाबांच्या विमान तिकीटाचे पैसे पण कापले गेले. त्यामुळे मला ते तितकेच पैसे मिळाले.”
शिव ठाकरेच्या या वक्त्यव्यावरून सर्वत्र पुन्हा एकदा बिग बॉस मराठीची चर्चा सुरु झाली आहे.