संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ हा सिनेमा मागील काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ८०० कोटींहून अधिक कमाई केली. सिनेमामुळे कलाकारांच्या प्रसिद्धीतही कमालीची वाढ झाली. ॲनिमलमध्ये मराठी अभिनेते उपेंद्र लिमये (Upendra Limaye) देखील झळकले आहेत.
उपेंद्र लिमये यांनी या सिनेमात फ्रेडी पाटील या शस्त्रसाठा पुरविणाऱ्या डिलरची भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनयाने आणि कौशल्याने उपेंद्र यांनी सिनेसृष्टीत आणि चाहत्यांच्या मनात त्यांचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे. यामुळेच ॲनिमल हा सिनेमा पाहताना जेव्हा स्क्रीनवर मराठमोळा कलाकार उपेंद्र येतात तेव्हा खूपच जल्लोष पाहायला मिळतो. तसेच चाहत्यांनीच नाही तर संदीप पाठक, सई ताम्हणकर यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांचे कौतुक केले.
ॲनिमल या सिनेमात उपेंद्र लिमये यांनी जवळपास फक्त १५ मिनिटांची भूमिका साकारली आहे. अन् त्यांच्या या भूमिकेचं आज जगभरात कौतुक होत आहे. या भूमिकेप्रमाणे काही वर्षांपूर्वी ‘जोगवा’ या सिनेमात त्यांनी साकारलेली ‘तायप्पा’ ही भूमिका देखील प्रचंड गाजली आणि त्यासाठी त्यांचे चांगले कौतुकही झाले होते. उपेंद्र यांना त्यांच्या या सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. या दोन्ही भूमिका नजरेसमोर असताना त्यांना या भूमिकांबद्दल जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यांनी खूपच स्पष्टपणे त्यांचे मत मांडले.
तेव्हा ते म्हणाले की, “‘जोगवा’मधील ‘तायप्पा’च्या भूमिकेची तुलना कोणाशीही होऊ शकणार नाही. कारण, त्या चित्रपटाची टीम आणि माझी भूमिका ते सगळं वेगळंच होतं. आज माझ्या तायप्पापेक्षा फ्रेडी पाटीलच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली याचं मुख्य कारण म्हणजे ‘जोगवा’ हा प्रादेशिक चित्रपट होता आणि ‘अॅनिमल’ चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. काही अमराठी लोकांनी अलीकडच्या काळात ‘जोगवा’ पाहिलाय. त्यांच्याकडून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. ‘जोगवा’ चित्रपटाला प्रादेशिकतेच्या मर्यादा होत्या. फ्रेडीला असं कोणतंच बंधन नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “फ्रेडीला एवढा प्रतिसाद मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. तीन दिवस मुलाखती सुरू असल्याने माझ्या संपूर्ण घराचा स्टुडिओ झाला होता. उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील काही डिजिटल प्लॅटफॉर्मकडून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या. एवढं भयानक यश मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. हे यश पाहून एक कलाकार म्हणून त्रास होतो. जर एवढं यश त्यावेळी तायप्पाला मिळालं असतं, तर काय मजा आली असती हे शब्दात नाही सांगता येणार…असं एक कलाकार म्हणून मला नक्कीच वाटलं.”
View this post on Instagram
चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल सांगताना उपेंद्र लिमये म्हणाले की, “आयुष्यात कधीही नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून जायचं नसतं आणि चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या म्हणून स्वत:ला मोठं समजायचं नसतं. जे कौतुक करतात त्यांचा मी कायम आभारीच आहे.”