सध्या भारतीय सिनेसृष्टीत सिनेमांच्या बाबतीत सर्वचजण निरनिराळे प्रयोग करताना दिसत आहेत. कधी सिनेमाच्या कथेवर, कधी एडिटिंगवर तर कधी भारतातीलच पण वेगवेगळ्या सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकारांना एकत्रित घेत सिनेमा बनवला जातो.
हा प्रयोग नवीन नसला तरी कलाकारांचे योग्य गुण ओळखून सिनेमासारखी कलाकृती बनवणे सोपे नाही. वेगवेगळे कलाकार एकत्रित आजवर अनेक सिनेमे बनले आहे. आता असाच एक नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे ‘अफलातून.’ या सिनेमातील कलाकारांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर शेअर करत या सिनेमाची घोषणा केली.
View this post on Instagram
या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत बॉलिवूडमधील कॉमेडी किंग म्हणून देशभरात ओळखला जाणारा अभिनेता जॉनी लिव्हर हे देखील झळकणार आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने पोस्टर शेअर करत लिहिले की, “मला सांगताना खूप आनंद होत आहे की, माझा नवीन आगामी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.” तसेच तिने पुढे लिहिले की, “तीन Detectives घेऊन येणार एका अशक्य केसची अफलातून स्टोरी, थिएटर्समध्ये बरसणार हास्याच्या सरी! #अफलातून, २१ जुलै पासून चित्रपटगृहांत.”
राजीव कुमार साहा निर्मित अफलातून या सिनेमात सिध्दार्थ जाधव, जॉनी लिव्हर आणि तेजस्विनी लोणारी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून तिघेही गुप्तहेरांची भूमिका साकारणार आहे. तर हे गुप्तहेर एका अशक्य केसचा तपास कसा करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण सिध्दार्थ जाधव आणि जॉनी लिव्हर म्हण्टल्यावर विनोदाचा भूकंप हा होणारच.
अफलातून या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन परितोष पेंटर यांनी केले आहे. हा सिनेमा येत्या २१ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.