मागील वर्षभरापासून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘परिणीती चोप्रा’ आणि आम आदमी पक्षाचे खासदार ‘राघव चड्डा’ यांची प्रचंड चर्चा सुरु आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांचं लग्न.
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघवने १३ मे रोजी साखरपुडा केला. दिल्लीमध्ये त्यांचा साखरपुडा अगदी शाही पद्घतीने पार पडला. तेव्हापासून त्यांचं लग्न कधी, कुठे अन् कोणत्या पद्धतीने होणार याकडेच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले होते. परंतू आता त्यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण परिणीती आणि राघव आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.
राजस्थानमधील उदयपूर येथे येत्या २४ सप्टेंबरला परिणीती आणि राघव लग्न करणार आहेत. उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’ हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचा हा शाही सोहळा पार पडणार आहे. चंदीगड येथील ताज हॉटेलमध्ये ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिणीती आणि राघव यांच्या रिसेप्शन पार्टीच्या आमंत्रण पत्रिकेनुसार त्यांचं लग्न पंजाबी रितीरिवाजाने होणार असल्याचे समजत आहे. त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम दोन दिवस सुरु असणार आहेत.
तर सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नपत्रिकेचे फोटो देखील चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यावरून २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता परिणीतीचा चुड्याचा कार्यक्रम पार पडणार. त्यांनतर दुपारच्या वेळेत सर्व पाहुण्यांसाठी शाही भोजनाची सोय आहे. तर लग्नाच्या एक दिवस आधी सायंकाळी ७ वाजता जलसा पार्टी होणार आहे. या पार्टीचे नाव ‘लेट्स पार्टी लाइक इट्स नाइन्टीज’ असे असून ही पार्टी ९०च्या दशकाच्या थीमवर आधारित असणार आहे.
२४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता परिणीती आणि राघव हे दोघेही आयुष्यभरासाठी लग्नाच्या नात्यात जोडले जाणार आहेत. तर त्यांच्या लग्नासाठी ‘अ पर्ल व्हाइट इंडियन वेडिंग’ ही खास थीम ठरवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या त्यांचे चाहते त्यांच्या येणाऱ्या लग्नाच्या फोटोकडे डोळे लावून बसले आहेत.
Also Read : Pankaj Tripathi Opens Library in Village, Inaugurates It in Memory of Late Father