सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. खऱ्या आयुष्यातही ते दोघेही जेव्हा पासून एकत्र आले तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
तसेच त्यांच्या लग्नानंतर अवघ्या काहीच महिन्यात दोघांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड गाजला. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आलियाने ती गरोदर असल्याची बातमी दिली. असे असूनही ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर सोबत अनेक ठिकाणी उपस्थित राहिली होती.
रणबीर आणि आलियाला कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर ते दोघेही किंवा आलिया कामातून ब्रेक घेणार अशा खूप चर्चा रंगल्या होत्या. पण आलिया अगदी काहीच दिवसांत पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. तसेच रणबीरही त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. रणबीरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर आलियाने देखील तिचा हॉलिवूड मधील पहिला चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’साठी जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे.
महत्वाचं म्हणजे रणबीर आणि आलिया या दोघांचा वेगवेगळा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. रणबीरच्या ॲनिमल या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते, त्यानंतर आलियाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे हे दोन्ही चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत.
आलियाचा चित्रपट हा ओटीटीवर तर रणबीरचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असला तरी या दोन्हींपैकी कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.