चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्यांच्या यादीत अभिनेता ‘संकर्षण कऱ्हाडे’चं अग्रणी आहे.
संकर्षण सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्यामुळे तो त्याच्या चाहत्यांसोबत अनेक नवनवीन खासगी आणि करिअर संबंधित गोष्टी शेअर करत असतो. तसेच त्याला फिरण्याची प्रचंड आवड आहे, हे सारेच जाणतात. त्यामुळे संकर्षणचे प्रवासातील फोटो, व्हिडीओ आणि खास म्हणजे त्याचे गमतीदार अनुभव ऐकायला, वाचायला त्याच्या चाहत्यांना खूपच आवडतात.
संकर्षणने नुकताच कॅनसास सिटी ते क्लिव्हलॅंड या अमेरिकेतील मोठ्या शहरांत विमानाने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक गोड अनुभव त्याने नुकताच शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संकर्षणने लिहिले की, “माझा हा अनुभव वेळ असेल तर; नक्की वाचा. कॅनसास सिटीहून क्लिव्हलॅंडला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती. विमान ऊडतं कसं, कसं चालवतात, ह्याच्याविषयी मनांत कायम प्रश्नं पडलेले असतात, म्हणुन दरवेळी मी विमानांत बसतांना कुतूहलाने केबीनकडे बघतोच. आजही तेच केलं.”
“तर हे ‘पायलट साहेब’ (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब , कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे ढाकळे वाटले. माझ्याकडे बघुन, स्वत:हून हसले. आपल्याला ‘ऊडवून नेणारा पायलट’ आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हणल्यावर हेच मोफत स्माईल दुपटीने परत करायला कसला भाव खायचा? म्हणुन मी त्यांच्यापेक्षा जास्तं मोकळा ढाकळा हसलो आणि त्याच्या केबीनकडे
‘काय भाऊ; येऊ का घरांत?’ च्या नजरेनेच पाहिलं, त्यालाही ते कळलंच. त्याने मग स्वत:हून ‘Welcome to my working area’ असं म्हणाल्यावर मी फार फार खुश झालो गड्या.”
तासेच पुढे लिहिले की, “पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन ही विमानं ऊडत असतात. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची, माॅनिटर, टेक आॅफ लॅंडिंगची ती दांडी. मज्जा वाटली पाहातांना. मला झालेला एकंदरीत आनंद पाहाता तो परत स्वतःहून म्हणाला; ‘सिट देअर अॅंड क्लिक अ पिक्चर’ मी पाहातच राहिलो. मला प्रश्नं पडला की, हा माझ्या चेहऱ्यावरचा अती आनंद पाहून मनांत मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अॅक्टींग करत ‘No no, Its ok’ वगैरे म्हणालो तर ‘कॅप्टन पिटर रसल भाऊंनी’ आग्रहाने पायलट सिटवर बसवलं आणि माझा फोटो घेतला.”
View this post on Instagram
“आर काय आनंद झाला म्हणून सांगू? मग प्रथेप्रमाणे ‘Can I click a Picture with you’ असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच. ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंसोबत फोटो काढला. थोड्या गप्पा झाल्या, नंबर एक्सेंज झाले. अजून जरावेळ एकत्रं घालवला असता तर; तो तरी म्हणाला असता की, ‘विमान चालवतोस का?’ किंवा मी तरी म्हणालो असतो ‘हो बाजूला मीच चालवतो.’ पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सिटवर येउन बसलो आणि पूर्ण प्रवासभर ‘आता तो हे बटन दाबत असेल. आता तो स्पिकरवर बोलत असेल.’ असा विचार करत आनंदात बसून राहिलो.”
तसेच शेवटी त्याने वाचकांसाठी एक कानमंत्रही दिला. तेव्हा संकर्षण म्हणाला की, “लोकंहो विचार करा. जरा स्माईल दिलं, प्रेमानं बोललं की, मनांत असलं ते सगळं होतंय.” तर त्याला आलेल्या या अनुभवाच्या आनंदात लिहिले की, “आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे.”