‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. त्याच्या या पहिल्या चित्रपटातून त्याने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक ठरलेल्या ‘सैराट’ या सिनेमामध्ये आकाशने परश्याची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. आता लवकरच तो ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या चित्रपटात झळकणार आहे. पण त्याआधी तो लग्न बंधनात अडकतोय की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटो मध्ये आकाश मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. “जमलय बर का, यायला लागतय, १० दिवस बाकी”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. त्यामुळे खरंच त्याचं लग्न ठरलं का अश्या चर्चां केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत असल्याने अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच विवाह बंधानात अडकणार, अश्या चर्चा होत आहेत.
पण त्याची ही पोस्ट त्याच्या लग्नासंबंधी नसून त्याच्या आगामी येणाऱ्या चित्रपटासंबंध आहे. लवकरच त्याच ‘घर, बंदूक, बिर्याणी’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. घर बंदूक बिर्याणी चा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्यातच आता ‘गुन गुन’ हे नवीन गाणं आल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘घर बंदूक बिरयाणी’ हा चित्रपट ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.