‘बाहुबली’ चित्रपटानंतर अत्यंत लोकप्रिय झालेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रामनवमीनिमित्त प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याच्या या चित्रपटाचे नाव ‘आदिपुरुष’ असे आहे. या चित्रपटामध्ये प्रभासने श्री रामाची भूमिका साकारली आहे. त्याच्या बरोबर या सिनेमात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान देखील आहे. सैफ अली खान ने या सिनेमात रावणाची भूमिका केली आहे. व सितेच्या भूमिकेमध्ये क्रिती सनोन आहे. आणि अभिनेता सनी सिंह लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेही ‘आदिपुरुष’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो हनुमानाच्या भूमिकेत आहे.
गेल्यावर्षी या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला. यातील स्पेशल इफेक्ट आणि रावणाचा लूक यावरून लोकांनी या टीझरला प्रचंड ट्रोल केलं. हा चित्रपट बॉयकॉट करावा इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केले आहे. या पोस्टरमध्ये राम, लक्ष्मण आणि सीता दिसत आहे. “मंत्रो से बढके तेरा नाम जय श्रीराम” असा कॅप्शनदेखील दिला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगु व मल्याळम या भाषेत प्रदर्शित होणार आहे. सर्वप्रथम हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणांमुळे लोकांचा विरोध पाहता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ओम राऊत यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची पुढील तारीख सांगितली होती. चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात ३डी मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती.
चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहते देखील उत्सुक झाले आहेत.