छोट्या पडद्यावरील दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे ‘हर्षद अतकरी.’
हर्षद आणि स्टार प्रवाह वाहिनीचे खूपच खास नाते आहे. काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ या लोकप्रिय मालिकेत हर्षदने केशव ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यावेळी देखील तो चांगलाच चर्चेत होता. त्यांनतर त्याने पुन्हा याच वाहिनीवर ‘फुलाला सुगंध मातीचा‘ या मालिकेत शुभम ही प्रमुख भूमिका साकारली. मालिकेतील कीर्ती आणि शुभम यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला असला तरी हे कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
आता हर्षदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हर्षद आता पुन्हा एकदा एका नव्या रुपात टेलिव्हिजनवर दमदार एंट्री करणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच एक नवी कथा घेऊन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती मालिका म्हणजे ‘कुन्या राजाची गं तू रानी.’ यावेळी हर्षदची भूमिका ही नेहमीपेक्षा नक्कीच वेगळी असणार आहे.
कुन्या राजाची गं तू रानी या नव्या मालिकेत हर्षद एका पत्रकाराची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. त्यामधील त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव ‘कबीर’ असे आहे. तसेच त्याच्यासोबत अभिनेत्री शर्वरी जोग देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शर्वरीने यापूर्वी ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतील शिवाच्या बहिणीची म्हणजेच ‘सोनी’ ही भूमिका साकारली होती. तर या नव्या मालिकेतून ती पहिल्यांदाच हर्षदसह प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेबद्दल सांगताना हर्षद म्हणाला की, “कबीर हे पात्र मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आहे. कबीर हा तळागाळात जाऊन काम करणारा पत्रकार आहे. मालिकेचं कथानकही खूप छान आहे. कामावर प्रचंड प्रेम करणारा असा हा कबीर साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिका संपल्यानंतर पुन्हा कधी भेटीला येणार याची सतत विचारणा होत होती. योग्य वेळी ही सुवर्णसंधी चालून आली आणि मी तातडीने या भूमिकेसाठी होकार दिला. माझ्या याआधीच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे.”
ही मालिका १८ जुलै पासून सुरू होणार असून दुर्वा मालिकेतील केशव आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम नंतर प्रेक्षक कुन्या राजाची गं तू रानी मधील कबीरला देखील तेवढेच प्रेम देतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हे देखील वाचा : ‘आदिपुरुष’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, नक्की वाचा…