सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘आदिपुरुष’ या सिनेमाची. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमात रामाची भूमिका प्रभास तर सीतेची भूमिका अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी साकारली आहे, तर हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसला. तसेच आदिपुरुष सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.
हा सिनेमा एकाच वेळी हिंदी, तेलगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तब्बल ६,२०० स्क्रीनवर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. त्यापैकी ४ हजार स्क्रीनवर हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. सिनेमा जरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, तरी प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. जस जसे प्रेक्षक सिनेमा पाहत आहेत, तस तसे सिनेमावर आणखी टीका होत आहेत. सिनेमातील पात्र त्यांचे कपडे त्यांचे संवाद यावर प्रेक्षक मोठ्या प्रमाणत टीका करत आहेत.
सिनेमावर सडकून टीका जरी होत असल्या तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलाच गल्ला जमवला आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची तब्बल ४ लाखांच्या घरात तिकीटाची विक्री झाली होती. आतापर्यंतची आकडेवारी बघता सिनेमाने पहिल्या दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला. या सिनेमाने भारतात ८५ ते ९० कोटींची कमाई केली असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
तसेच हिंदी मध्ये ४० ते ४५ कोटींची कमाई केली आहे. प्रभासचे दाक्षिण्यात चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. भारतासह परदेशात देखील एकाच वेळी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी संपूर्ण जगभरात २००० स्क्रीनवर सिनेमा झळकला. त्यामुळे भारताबाहेरही या सिनेमाने ३५ ते ४० कोटींची कमाई केल्याचे समोर आले.
५०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५० कोटींचा टप्पा पार केला. येत्या दोन दिवसात वीकेंडमुळे हा सिनेमा आणखी दमदार कमाई करेल अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे.