बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ने ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटानंतर सिनेमासृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण आता तिने एका धमाकेदार चित्रपटातून कमबॅक केले आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर ऐश्वर्या ‘पोन्नियन सेल्वन’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ऐश्वर्या पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार यामुळे चाहते ही चित्रपटासाठी उत्सुक आहेत.
‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या या ट्रेलरची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे कारण हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषेत प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर बघितल्यावर सर्वात प्रथम आठवण होते ती ‘बाहुबली’ या चित्रपटाची. ट्रेलरनुसार ‘पोन्नियन सेल्वन’ हा एक ऐतहासिक चित्रपट आहे. कल्की कृष्णमूर्ती यांच्या १९५५ मधील पोन्नियन सेल्वन या कादंबरीवर आधारित दोन सिनेमॅटिक भागांपैकी हा पहिला भाग आहे.
ऐश्वर्या या चित्रपटात राजकुमारी नंदिनी या भूमिकेत दिसणार आहे. तिची व्यक्तिरेखा आणि सौंदर्य पाहून सर्वांनाच भूरळ पडली आहे. कारण ती राजकुमारी नंदिनी आणि मंदाकिनी देवी हि दुहेरी भूमिका साकारणार आहे. तसेच साऊथचा सुपरस्टार अभिनेता विक्रम या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, लाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यामुळे आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.