मराठी सिनेसृष्टीत अश्या अनेक जोड्या आहेत ज्यांचं मालिकेच्या सेटवर प्रेम जुळले आहे आणि त्यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. मराठी कलाविश्वातील छोटया पडद्यावरील अशाच एका लोकप्रिय जोडीने आता खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’या मालिकेतील लोकप्रिय जोडी नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. या मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच योगिता चव्हाण हिने याचं मालिकेतील तिचा सहकलाकार म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुले याच्या सोबत साताजन्माची गाठ बांधली आहे. मालिकेतील एकमेकांचे जोडीदार असणारे अंतरा आणि मल्हार आता खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार झाले असून आता आयुष्यभरासाठी एकमेकांचे हमसफर झाले आहेत. कशाचीही खबर न लागू देता या दोघांनी गुपचूप लग्न उरकले. त्यांनी थेट लग्नाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
लग्नाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “३ मार्च २०२४…आयुष्यभराचा हमसफर.” आज म्हणजेच ३ मार्च २०२४ रोजी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. अगदीच साध्या पद्धतीने दोघांनी लग्न केले. यावेळी योगीताने गडद लाल रंगांची हिरवा काठ असलेली साडी आणि सौरभने फिकट सोनेरी रंगाचा सदरा आणि त्यावर योगिताला मॅचिंग अशी हिरव्या रंगाची शाॅल घेतली आहे. योगिताने लग्नात ‘आली ठुमकत’या गाण्यावर डान्स करत एन्ट्री मारली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
त्यांच्या लग्नाची कुठेच चर्चा किंवा कुठेच बोलबाला झाला नाही. ना हळदीचे फोटो, ना साखरपुड्याचे फोटो डायरेक्ट मंगळसूत्र घालतानाचा फोटो त्यांनी टाकला. आजपर्यंत कधीच या दोघांचे अफेअर आहे असे देखील समोर आले नाही. ना कधी ते दोघे एकत्र फिरताना दिसून आले ना कधी एकमेकांना डेट करत आहेत असं कोणाला वाटलं. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘जीव माझा गुंतला’या मालिकेतून अंतरा आणि मल्हार महराष्ट्रातील घराघरात पोहचले. आता जरी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. खास करून अंतरा आणि मल्हार यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
त्यांच्या अचानक लग्न करण्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक मराठी कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत त्यांचं अभिनंदन केले.