मराठी सिनेसृष्टीत सध्या दिमाखात गाजणारा सिनेमा म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर. २८ एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला अन् सर्वत्र चर्चा रंगली ती या सिनेमाचीच. या सिनेमाचं वेड फक्त प्रेक्षकांना नाही तर अनेक दिग्गज कलाकारांना देखील लागले आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा पाहून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आवाजाने वेड लावणारे सुप्रसिध्द गायक-संगीतकार अवधूत गुप्ते देखील भारावून गेले आहेत. सिनेमा पाहता वेळीचा एक खास फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या पोस्टमधून त्यांनी महाराष्ट्र शाहीर या सिनेमाबद्दल त्यांचा अनुभव कसा होता हे सांगताना त्यांनी लिहिले की, “महाराष्ट्र शाहीर – मराठी चित्रपटसृष्टीला अभिमान वाटावा असा… साजरा करण्यासारखा सिनेमा काल मित्रांसोबत पाहिला! ‘मी वसंतराव’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या दोन गायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जवळपासच्या कालावधीमध्ये प्रदर्शित झाले आणि पिढ्यान् पिढ्या गेल्या तरी देखील, शास्त्रीय असो वा लोकसंगीत गायक, आम्हा गायकांच्या आयुष्यातील संघर्ष हा फारसा बदललेला नाही याची जाणीव झाली.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “अमित दोलावत, निर्मिती ताई, दुष्यंत, सना आणि सर्वच कलाकारांची कामे प्रचंड आवडली! मात्र अंकुशच्या आजवरच्या कामामध्ये हे सर्वोत्कृष्ट काम आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते. अजय- अतुलचे संगीत नेहमी प्रमाणे अप्रतिम! केदार, तुझी मेहनत आणि बाबांवरचं तुझं प्रेम प्रत्येक फ्रेम मधून ओसंडून वाहताना दिसतंय. ते जिथे कुठे असतील तेथून तुला भरभरून आशीर्वाद देत असणार हे नक्की !!”
अवधूत गुप्ते यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तसेच अनेक मोठ मोठी कलाकार मंडळी आणि प्रेक्षक महाराष्ट्र शाहीर या बहुचर्चित सिनेमाला सोशल मीडियावर भरभरुन दाद देत आहेत.