मालिका असो वा सिनेमा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेचा विचार केला असता नजरेसमोर येणारा चेहरा म्हणजे अभिनेता ‘चिन्मय मांडलेकर’. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारा हा अभिनेता लेखकाची, निर्मात्याची आणि दिग्दर्शकाची धुरा अगदी उत्तमपणे सांभाळत आहे.
चिन्मय मांडलेकर ने स्वतः लिहिलेलं तसेच स्वतः दिग्दर्शित केलेले ‘गालिब’ हे मराठी नाटक नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. माझा होशील ना या मालिकेतील सई आणि आदित्य म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांची ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यामुळे सध्या मराठी सिनेसृष्टीत याच नाटकाची चर्चा रंगली आहे. तसेच हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडत आहे.
चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकांव्यतिरिक्त मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी त्याचे अनेक सिनेमे आणि त्यातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीतील कामाचे आणि एकूण वातावरणाचा त्यांना अनुभव आहे. सध्या नाटकामुळे होणाऱ्या अनेक मुलाखतीत चिन्मय अनेक गोष्टींवर बोलताना आढळले. त्यापैकी चिन्मय यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील काम करतानाचा फरक सांगितला.
तेव्हा ते म्हणाले की, “माझा हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा अनुभव चांगला आहे. मला तिथे विशेष असा काही फरक जाणवला नाही. पण त्यांचा स्तर अधिक मोठा आहे, हा फरक नक्कीच आहे. जिथे आपण एक मराठी चित्रपट साधारण २५ ते ३० दिवसात पूर्ण करतो. तिथे हिंदी चित्रपटसृष्टीत थोडीशी मुभा असते. कारण त्यांचा शूटींगचा काळ हा ५० ते ६० दिवसांचा असतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “त्यामुळे निर्मिती खर्च आणि अन्य गोष्टींमुळे त्यात भव्यपणा नक्कीच जाणवतो. बाकी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा असा काही फरक जाणवला नाही. फक्त मराठी चित्रपटसृष्टीत बजेट आणि चित्रीकरणाच्या मर्यादित दिवसांच्या अनुषंगाने दिवसांचं काम थोडं जास्त असतं. तर हिंदी चित्रपटसृष्टीत थोडंसं निवांत काम चालू शकतं.”
चिन्मयने ‘तेरे बिन लादेन’, ‘शांघाई’, ‘मोक्ष’, ‘समीर’, ‘भावेश जोशी सुपरहिरो’ ‘द कश्मीर फाइल्स’ ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या हिंदी सिनेमांत त्यांनी काम केले आहे. तसेच चिन्मय सारखेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आहेत, जे हिंदी सिनेसृष्टीत आपल्या नावाचा झेंडा रोवत आहेत.