देवोलीना ही गेल्या दोन वर्षांपासून जिम ट्रेनर शाहनवाजला डेट करत होती. या नंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र शाहनवाज मुस्लीम असल्याने देवोलीनाला ट्रोल केलं जात आहे. एका युजरने देवोलीनाची खिल्ली उडवत तिला विचारलं की, तिची मुलं हिंदू असतील की मुस्लीम? काही वेळानंतर संबंधित युजरने त्याचं ट्विट डिलिट केलं, मात्र त्यावर देवोलीनाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
‘माझी मुलं हिंदु असो किंवा मुस्लीम, तुम्ही विचारणारे कोण? तुम्हाला जर मुलांची इतकी काळजी असेल तर बरीच अनाथाश्रमं आहेत, तिथून एखाद्याला मुलाला दत्तक घ्या. तुमच्या हिशोबाने त्याचा धर्म आणि नाव निवडा. माझे पती, माझी मुलं, माझा धर्म, माझे नियम….तुम्ही विचारणारे कोण, असा सवाल देवोलीनाने केला.
यापुढे आणखी एक ट्विट करत तिने लिहिलं, ‘मला आणि माझ्या पतीला सोडा, आम्ही आमचं बघून घेऊ. दुसऱ्यांच्या धर्माविषयी गुगल सर्च करण्याआधी तुम्ही तुमच्या धर्मावर लक्ष केंद्रीत करा आणि चांगली व्यक्ती बना. एवढं तर मला नक्कीच माहीत आहे, की तुमच्यासारख्या लोकांकडून ज्ञान घेण्याची मला अजिबात गरज नाही.’
देवोलीनाच्या आंतरधर्मीय लग्नामुळे तिचा सख्खा भाऊ अंदीप भट्टाचार्यदेखील खूश नसल्याचं दिसत आहे. देवोलीनाच्या लग्नानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.