मालिकाविश्वात विविध वाहिन्या नव्या संकल्पना घेऊन नवनवीन मालिका प्रदर्शित करत असतात. तसेच झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील रमाचा संसार सांभाळणारी आनंदी अल्पावधीत घराघरांत पोहोचली. रमा-राघवच्या संसारात आलेला हा नवा गडी म्हणजेच आनंदीचं काही काळाने नवं राज्य पाहायला मिळालं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि अधिराज्य गाजवू लागली.
नवा गडी नवं राज्य ही मालिका गेल्यावर्षी ८ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झाली. पल्लवी पाटील व माझ्या नवऱ्याची बायको मधील राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिने या मालिकेतून कमबॅक केले तसेच कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी स्टार कास्ट असणाऱ्या या मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्रृती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर या नवरा-बायकोने केली होती. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने टीआरपी यादीमध्येही अनेकदा चांगले स्थान पटकावले होते.
अनिता दाते सोबतच पल्लवी पाटीलचीही मालिकेत मुख्य भूमिका होती पल्लवीने जरी तिच्या करिअरची सुरुवात चित्रपटातून केली असली तरी सुद्धा तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. ही मालिका दिवसेंदिवस चांगलाच चाहतावर्ग कमावत होती. काही प्रमाणात ही मालिका ट्रोलही होत होती मात्र अल्पावधीत चर्चेत आलेली मालिका असं नक्कीच ‘नवा गडी नवं राज्य’ बाबत आपण म्हणू शकतो. या मालिकेने अलिकडेच झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट मालिका‘ हा पुरस्कारही पटकावला.
या मालिकेने काहीच दिवसात प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले. पण या मालिकेचा शेवट होणार हे समजताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मालिका बंद होऊन सहा-सात दिवस उलटून गेले तरीही चाहात्यांमध्ये मालिकेची क्रेझ अजूनही तशीच आहे. मालिकेतील आनंदी म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटीलने सोशल मीडियावर काही तासांपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये असे दिसून येत आहे की, या मालिकेची क्रेझ मोठ्यांमध्ये तर होतीच पण लहान मुलांमध्ये देखील प्रचंड क्रेझ होती. हे या व्हिडीओ मधून पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
परंतू आता एका सुंदर वळणावर थांबून या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आता नव्या २ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.