आज सर्वचजण अगदी आनंदात सरत्या वर्षाला निरोप देत आहेत आणि मोठ्या उत्साहात २०२३ या नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेकजण न्यू इयर पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये असतात तर अनेकजण नवीन वर्षातील खासगी आणि व्यवहारिक आयुष्याबद्दल प्लॅनिंग करत असतात.
सर्वसामान्यांप्रमाणे आपले लाडके कलाकारही नववर्षाच्या निमित्ताने प्लानिंग करत असतात. अभिनेत्री करीना कपूरने देखील नवीन वर्षातील तिच्या प्लॅन बद्दल सांगितले आहे.
करीना कपूर सध्या तिच्या कुटुंबियांसोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत त्याचे अपडेट चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेअर करत आहे. तसेच ती तिच्या नवीन वर्षाची सुरुवात तिथेच करणार हे नक्की. तर यंदा करीनाने २०२३ वर्षासाठी काही संकल्प केले आहेत. तिने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याबद्दलचा उलगडा केला आहे. तिने तिच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्या करियरबद्दलही अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
मुलाखतीमध्ये करीनाने सांगितले की, “कपूर कुटुंबात प्रत्येकजण कलाकार आहे, पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा आहे. जसं माझे वडील रणधीर कपूर आणि काका ऋषी कपूर यांचा इंडस्ट्रीतला प्रवास खूप वेगळा आहे, तसाच माझा आणि माझी बहिण करिष्माचाही प्रवास वेगळा आहे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला आणि यश मिळवून दाखवलं. अशा कुटुंबाचा मी भाग आहे, याचा मला कायम अभिमान आहे.”
तसेच नवीन वर्षासंबंधित बोलत असताना करीना म्हणाली की, “२०२३ मध्ये मला अनेक गोष्टींमध्ये समातोल साधायला शिकायचंय. याचं कारण म्हणजे, जेव्हा तुम्हाला दोन मुलं असतात आणि तुम्हाला कामही करायचं असतं तेव्हा अनेकदा तारांबळ उडते. एका पायावर उभं राहून आपण आपलं शरीर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जशी कसरत होते तशीच कसरत मुलांना सांभाळून काम करताना होते. नवीन वर्षात जास्तीत जास्त वेळ माझ्या आई-वडिलांसोबत घालवायचा आहे, आणखीन आनंदी राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रत्येकजण नवीन वर्षात काही ना काही मोठं करून दाखवण्याचा संकल्प करतो पण प्रत्येकाने आनंदी आणि समाधानी राहण्याचा संकल्प केला पाहिजे असं मला वाटतं.”