सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या मुलांना वेळ देणं पालकांसाठी खूपच कठीण होऊन जात. आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही ही खंत प्रत्येक पालकांच्या मनात असते. त्यात सिनेकलाकारांसाठी तर हे फारच अवघड होऊन जात. त्यांना शुटिंगनिमित्त नेहमीच घरापासून दूर रहाव लागतं.
सध्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील अभिनेत्री म्हणजेच मधुराणी प्रभुलकर . मधुराणीला या मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. मधुराणी सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय असते.
मधुराणी शुटींग निमित्त मुंबईमध्ये असते आणि तिची लेक पुण्याला असते. त्यामुळे मधुराणीला आपल्या मुलीला पुरेसा वेळ नाही देता येत. काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेऊन ती तिच्या लेकीसह ऑस्ट्रेलियाला गेली होती. याचे मुख्य कारण म्हणजे मालिकेच्या शूटिंगमुळे मधुराणी आठवड्यातले चार ते पाच दिवस मुंबईत असते आणि दोन-तीन दिवस पुण्याला त्यांच्या घरी असते. या ट्रिपवरून परत आलेल्या मधुराणीने एक खास पोस्ट लिहिली आहे.
तिने या ट्रीपचे काही फोटो शेअर करत लिहिले आहे, “ गेली ३ वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झालंय. ७/८ दिवस मुंबईत शूट करायचं आणि २/३ दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये…. long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो…
गेल्या ३ वर्षात सलग असे ८/१० दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. ह्याची रुखरुख असते, अपराधीपण असतं.. आणि खूप सारा ताण असतो.
माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिप ची ही संधी चालून आली. ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कवीमनाचा उमेश थत्ते. एक दिवस अचानक त्याचा फोन आला ‘मी तुझ्या ‘कवितेचं पान’ चा मोठा फॅन आहे… इथे काही कवी आहेत… तुझा एपिसोड इथे करता येईल का ? ‘ मी म्हंटलं, ‘ मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते’ त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं… ‘आई… ‘च्या टीम ने पण प्रंचड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरलीच ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली.”
पुढे तिने लिहिले आहे, “ आणि ती तशी झाली ती आमच्या प्रेमळ होस्ट्स मुळे… उमेश- गौरी थत्ते आणि त्यांची मुलं अवनीश आणि अर्णव.
आमची उत्तम राहण्याची सोय, खाण्यापिण्याची चंगळ तर ह्यांनी पुरवलीच पण स्वरालीची खूप प्रेमाने काळजी घेतली , खरंतर तिचे लाड केले, सारे हट्ट पुरवले असंच म्हणायला हवं.. सिडनीमधलं जिणं खूप धकाधकीचे आहे, त्यात आपल्या पाहुण्यांसाठी रजा काढून त्यांना ठिकठिकाणी घेऊन जाणं, उत्साहाने फिरवणे इतकं सोपं नाही हो… त्यांनी केला तो पाहुणचार नाही तर जीव लावणं असच म्हणायला हवं… सिडनी ट्रिप उत्तम झालीच पण स्वराली ला अजून एक प्रेमाची फॅमिली मिळाली आणि दोन दोन दादा सुद्धा…!!”