मराठीमध्ये असे अनेक सिनेमे आले आहेत, जे मराठी रंगभूमीवरील नाटकांवर आधारित आहेत. मराठी सिनेश्रुष्टीत जितकं महत्त्व सिनेमांना, तितकच महत्त्व नाटकांना देखील आहेत. अनेक कलाकार आधी नाटकं करतात आणि नंतर ते सिनेमाकडे वळतात. असचं एक रंगभूमी गाजवणारे नाटक आता मोठ्या पडद्यावर सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना आवडणारे बालनाट्य म्हणजे ‘अलबत्त्या गलबत्त्या’.
नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या या नाटकाने ७० च्या दशकात प्रेक्षकांवर जादू केली. त्यावेळी सर्वात जास्त गाजलेलं हे बालनाट्य आजच्या दशकात देखील तितकच लोकप्रिय आहे. यांनी या नाटकातील सगळ्यात जास्त गाजलेलं पात्र म्हणजे ‘चिंची चेटकीण’, त्यावेळी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी चिंची चेटकीणीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना आणि लहान मुलांना प्रचंड आवडली होती. हे नाटक अनेक महिने, अनेक वर्ष सुरु राहिले.
त्यांनतर झी प्रस्तुत आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शतीत पुन्हा एकदा हे नाटक नव्या जोमाने, नव्या कलाकारांच्या आणि अर्थातच नव्या प्रेक्षकांच्या साथीने पुन्हा एकदा सुरु झाले. यावेळी मात्र चिंची चेटकीणीच्या भूमिकेत नवा चेहरा होता, आणि तो म्हणजे हरहुन्नरी अभिनेता वैभव मांगले. वैभवने देखील हे पात्र खूप छान साकारलं. प्रेक्षकांनी आणि लहान मुलांनी तर हे पात्र अगदी डोक्यावर घेतले. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी वैभवचं तोंड भरून कौतुक केले. याचे प्रयोग देखील आतापर्यंत असंख्य झाले आहेत, तितक्याच उत्साहाने आणि आवडीने प्रेक्षक देखील हे नाटक आवर्जून पाहायला जातात. लहान मुल या चेटकीणीला पाहून जितके जास्त घाबरतात तितकीच ती चेटकीण त्यांना आवडते देखील.
आता हीच चेटकीण आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, आणि तेही थ्रीडीमध्ये. या सिनेमाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि ‘न्यूक्लिअर अॅरो’चे ओंकार सुषमा माने हे करणार आहेत. तर ‘भालजी पेंढारकर चित्र’ हे या सिनेमाचे सह-निर्माते असणार आहेत. या सिनेमात व्हीएफक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. १ मे २०२५ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, नुकतच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. प्रेक्षक या टीझरला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या सिनेमात वैभव मांगले मुख्य भूमिकेत म्हणजेच चिंची चेटकिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत.