आपल्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळी. (Prajakta Mali). ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील मेघना आणि आदित्यची जोडी प्रचंड गाजली होती. या मालिकेच्या आधी देखील प्राजक्ताने मालिकांमध्ये काम केले होते. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील तिच्या मेघना या पात्रामुळे. या मालिकेमुळे प्राजक्ता घराघरात पोहचली. त्यांनतर ती अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली. तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात सूत्रसंचलनाची भूमिका पार पाडत आहे.
प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्या चाह्त्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने एक नियम लागू केला. आणि तो नियम म्हणजे आपल्या नावात वडिलांच्या नावाच्या आधी आपल्या आईचे नाव लावायचे. त्यांच्या या निर्णयाचे सगळ्यांनी स्वागत केले. या नंतर अनेकांनी आपल्या नावात आईचे नाव जोडले. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील या निर्णयाचे कौतुक करत आपल्या नावात आईचे नाव जोडले.
आता प्राजक्ता माळीने देखील तिच्या नावात बदल केला आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. तिने तिच्या नावाचा फोटो शेअर करत खाली लिहिले आहेत की, “नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे , अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे, आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट. धन्यवाद.”
View this post on Instagram
प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत तिचं कौतुक केले आहे. एकाने लिहिले आहे की, “खूपच छान संकल्पना आहे सरकारची, सर्व मातांना त्यांची खरी जागा मिळवून दिली आहे…प्राजू तू ही जनजागृती करून अशा सुंदर संकल्पना पुढे नेतेस त्यासाठी तुझे आभार.” तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “मातृसत्ताक धर्म, मातृसत्ताक देश.”