मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमात निरनिराळ्या भूमिका साकारत कधी उत्तम अभिनेता म्हणून तर काहीच पण दमदार सिनेमांचे दिग्दर्शन करून आपल्यातील बहुढंगी कौशल्याने तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रसाद ओक’ (Prasad Oak).
आपणांस ठाऊक आहे की, प्रसाद सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. तर या शोमधून तो जसा त्याच्या चाहत्यांना जवळून अनुभवायला भेटला. अगदी तसाच किंबहुना त्याहून अधिक तो हास्यजत्रेच्या टीमच्या जवळ आहे. त्यामुळे प्रसाद आणि हास्यजत्रेच्या संपूर्ण टीममध्ये खूपच खेळीमेळीचे वातावरण आहे. तसेच प्रसादची पत्नी मंजिरी ओक हिचे देखील सर्वांसोबत खूप जवळचे संबंध आहेत. त्यामुळे हे सारेजण कायम एका कुटुंबासारखे भासतात.
View this post on Instagram
कुटुंब म्हण्टल की मजा-मस्ती आलीच, याचाच एक भाग म्हणजे हास्यजत्रेची संपूर्ण टीम मागील अनेक महिन्यांपासून प्रसादकडे पार्टी मागत होते. पण प्रसाद मात्र कोणाला पार्टी द्यायचं नावच घेईना. हा किस्सा शेवटी इतका रंगला की, अक्षरशः शोमधील होणाऱ्या सादरीकरणामध्ये देखील प्रसादने आतातरी पार्टी द्यावी असा मुद्दा मांडणारे अनेक मजेशीर टोमणे मारले गेले. त्यामुळे प्रसादच्या या पार्टीचा मुद्दा चांगलाच गाजला. पार्टी जरी हास्यजत्रेच्या टीमला मिळणार असली तरी या पार्टीची वाट असंख्य प्रेक्षक पाहत होते.
२०२४ हे नवं वर्ष सुरु झालं, त्यामुळे यंदा तरी प्रसाद पार्टी देईल का? ही शाश्वती नव्हती. पण वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने स्वतःचं नवीन आलिशान घर खरेदी केलं. नवीन घरासाठी प्रसादच्या चाहत्यांकडून त्याला असंख्य शुभेच्छा मिळाल्या. तसेच हास्यजत्रेच्या टीमकडून सुद्धा त्याला शुभेच्छा मिळाल्या. शिवाय पुन्हा एकदा पार्टीचा विषय उफाळून आला अन् साऱ्यांनी प्रसादकडे पुन्हा पार्टी मागितली. अखेर तो दिवस उजाडला आणि प्रसादने संपूर्ण टीमला एकदाची पार्टी दिलीच. काल १८ मार्च रोजी सर्वांनी एकत्र येत जंगी पार्टी केली. या पार्टीचे फोटो पोस्ट करत स्वतः प्रसादने त्याच्या चाहत्यांना पार्टीची बातमी दिली.
प्रसादने फोटो पोस्ट करत ही बातमी दिली. यावेळी अमित फाळके, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, सचिन गोस्वामी, दत्तू मोरे, सचिन मोटे, समीर चौघुले, रोहित माने, निखिल बने, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, शिवाली, प्रियदर्शिनी इंदलकर यांसह टीममधील अनेकजण या पार्टीसाठी आवर्जून उपस्थित राहिले. सर्वांसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्रसादने तितकेच मजेशीर कॅप्शन दिले. पोस्ट करत त्याने लिहिले की, “ऐका हो ऐका…अखेर हास्यजत्रा टीमला पार्टी दिलेली आहे…समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी. मंडळ आभारी आहे!”
प्रसादच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून त्याच्या चाहत्यांनी देखील अनेक गमतीशीर कमेंट्स केल्या. एकाने लिहिले की, “कशाला दिलीत पार्टी समीर दादाच्या स्किटमधला एक पंच कमी झाला.” तर दुसऱ्या लिहिले की, “आता स्किटमध्ये काय बोलून टोमणा मारणार…” त्यामुळे आता पार्टी देऊनही प्रसादच्या पार्टीची पुन्हा एकदा चर्चा सुरुच आहे.