विषय कोणताही असो एकदा का मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली की, प्रेक्षक मालिकेला आणि कलाकारांना अगदी डोक्यावर घेतात. सासू-सून, प्रेमकहाणी अशा अनेक विषयांवरील मालिका चांगल्याच प्रसिद्ध होतात. तसेच मागील ६ वर्षांपासून ते आजही एका धार्मिक मालिकेला तितकीच लोकप्रियता मिळत आहे. ती मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं.’
२०१८ मध्ये बाळूमामांच्या नावानं चांगभलं या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या मालिकेतील बाल्यावस्थेतनंतर ते अगदी उतार वयातील बाळूमामांची मुख्य भूमिका अभिनेता सुमित पुसावळे याने साकारली. या भूमिकेमुळे सुमितने लोकप्रियतेचं शिखर गाठलं असं म्हणायला देखील काही हरकत नाही. पण आता इतक्या वर्षानंतर या अभिनेत्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे मालिकेत मोठा बदल पाहायला मिळाला. तर त्याच्यानंतर आता अभिनेते प्रकाश धोत्रे मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारणार आहेत.
बाळूमामांच्या नावानं चांगभलं या मालिकेतून जरी सुमितची एक्झिट झाली असली तरी आजपासून म्हणजेच १८ मार्चपासून सुमित स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पुन्हा प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सुमितने बाळूमामांच्या नावानं चांगभलं ही मालिका का सोडली? हा प्रश्न अनेक दिवसांपासून साऱ्यांच्या मनात रेंगाळत होता. पण आता जवळपास दोन आठवड्यानंतर यामागील खरं कारण स्वतः सुमितने सांगितले.
याबद्दल सांगताना सुमित म्हणाला की, “मी गेली अनेक वर्ष बाळूमामांची भूमिका करत होतो. पण पुढे जाणं गरजेचं असतं. नवीन काहीतरी करणं तितकंच गरजेचं असतं. मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा पेचात सापडलो होतो. म्हणजे सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की का? कशासाठी? तू असं का करतोयस? पण ज्यावेळेस हा प्रोमो आऊट झाला तेव्हा लोकांचं असं म्हणणं होतं की नाही यार आम्हाला हे ही छान वाटतंय. तुम्हाला या रूपात बघायलाही खूप छान वाटतंय. आणि खूप पॉसिटीव्ह फीडबॅक आला माझ्या कामाचा माझ्या दिसण्याचा. हे वेगळं दिसतंय. आधी जे केलं त्याची कुठेच छटा नाहीये वगरे. लोकं म्हणाले की आम्हाला हे ही पाहायला आवडतंय. त्यावेळेस थोडंसं हायसं झालं की नाही यार लोकांना आवडतंय लोकं एक्सेप्ट करतात.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सुरुवातीला जे दडपण होतं हे कमी झालं त्या कमेंट्स वाचून वगरे. आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं त्यामुळे खूप छान वाटतं. आणि मी नवीन रूपात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी खूप उत्सुक आहे.”
सुमित पुसावळेसह घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे देखील झळकणार आहे. तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका हिंदीमधील ‘कहानी घर घर की’ या मालिकेचा रिमेक आहे.