बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होता. पण आता तो पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याच्यावर एका मागोमाग एक येणारी संकटे.
शाहरुख खानची पत्नी गौरी खान विरोधात गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आले. लखनऊमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू त्यावर गौरी यांनी अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे संकट कुठे कमी होत नाही तर त्यातच शाहरुख संबंधित आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
शाहरुखच्या राहत्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यात घुसखोरीचा प्रकार झाला आहे. मन्नतमध्ये दोन तरुण घुसल्याची माहिती समोर आली आहे. हे तरुण मन्नतच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. मन्नतमध्ये सुरक्षा रक्षक असतानाही घटना घडल्यामुळे सर्वच आश्चर्यचकित होतं आहेत.
२ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे. हे दोन्ही तरुण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत बंगल्याच्या भिंतीवरून उड्या मारत आत शिरले आणि तर तब्बल तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचले होते. परंतु थोड्याच वेळात सुरक्षा रक्षकांना त्यांची चाहूल लागली आणि त्यांनी या तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान समोर आले की हे तरुण गुजरातमधील सुरतचे आहेत. पोलिसांनी त्या तरुणांना या कृत्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, ” आम्ही गुजरातचे आहोत आणि आम्ही शाहरुख खानला भेटण्यासाठी गुजरातवरून इथे आलो होतो.”
परंतू महत्वाचं म्हणजे हा प्रकार जेव्हा झाला तेव्हा शाहरुख खान घरी नव्हता. त्यामुळे परवानगीशिवाय घरात शिरल्यामुळे त्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.