यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या वर्षीचा सोहळा भारतासाठी देखील खूप खास आहे. भारतातील ‘चेल्लो शो’ आणि ‘आरआरआर’चे ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्करसाठी नामांकित झाले आहे. त्यामुळे यंदा आपण ऑस्कर पटकावणार कि नाही हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तसेच ऑस्करच्या या दिमाखदार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्यावर खास परफॉर्मन्स सादर होणार आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तर आता दुसरीकडे अभिनेत्री दीपिका पादुकोण ऑस्कर सोहळ्यात सहभागी होणार असून तिच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
कान्स सारख्या जागतिक पुरस्कारांमध्ये सहभागी झाल्यानंतर आता दीपिका पदुकोण ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. एवढंच नाही तर तिच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. येत्या 13 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात पुरस्काराची प्रस्तुतकर्ता म्हणून दीपिकाची निवड झाली आहे. खुद्द दीपिका पदुकोणनेच चाहत्यांना ही माहिती दिली आहे. दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याची माहिती देताच चाहत्यांन मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
View this post on Instagram
दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्याशिवाय इतर कोणते सेलिब्रिटी यावेळी ऑस्कर 2023 मध्ये सादर करणार आहेत हेही सांगितलं आहे. दीपिकाने पोस्टमध्ये, यंदाच्या ऑस्करमध्ये ड्वेन जॉन्सन, मायकेल बी. जॉर्डन, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल. जॅक्सन, मेलिसा मॅककार्थी, झो सालडाना, जोनाथन मेजर्स, क्वेस्टलव्ह आणि डॉनी येन हे प्रेझेंटर असतील हे सांगितलं आहे.
आता दीपिका ही केवळ भारतातलीच नाही तर जगातील लोकप्रिय स्टार आहे असं म्हंटल तरी हरकत नाही. तिचे आकर्षण परदेशातही पाहायला मिळत आहे. कान्स आणि इतर फिल्म फेस्टिव्हलमधल्या सहभागानंतर आता दीपिका पदुकोण ऑस्करमध्ये दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका पदुकोण ऑस्कर प्रस्तुतकर्ता आहे, तर ‘नाटू नाटू’ गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव ऑस्करच्या रात्री लाइव्ह परफॉर्म करतील. ‘नाटू नाटू’ला ऑस्करच्या ‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. आता ह्या पुरस्कारासाठी चाहते देखील मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत.